इंदापूर: आज महाराष्ट्रात सर्वत्र रंगपंचमीचा उत्साह दिसून आला, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सारेच रंग खेळण्यात दंग होते. याच उत्साहात वृक्ष संजिवनी परिवाराने एक अनोखी आणि पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी केली. नगर परिषदेच्या सहकार्याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तळावरील ५०० झाडांना पाणी देऊन या संस्थेने एक वेगळा आदर्श निर्माण केला.
हिंदू संस्कृतीत वृक्षांना देवाप्रमाणे मानले जाते. श्रीकृष्ण देखील झाडांवर बसून आपल्या सवंगड्यांसोबत रंग खेळायचे, या परंपरेचा उद्देश वृक्षांना पाणी मिळावे, त्यांचे संवर्धन व्हावे आणि त्यातून वनसृष्टी हिरवीगार व फुलांनी बहरावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा आहे. याच भावनेतून वृक्ष संजिवनी परिवाराने ही अनोखी रंगपंचमी आयोजित केली होती.
या उपक्रमात वृक्ष संजिवनी परिवाराच्या सायरा भाभी आत्तार, रश्मीताई निलाखे, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, हमीदभाई आत्तार, कृष्णा ताटे, प्रशांत गिड्डे, मेजर बाजीराव शिंदे, सुधाकर बोराटे, रविंद्र परबत, देवराव मते यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. सर्वांनी मिळून उत्साहाने या ५०० झाडांना पाणी दिले आणि पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश दिला.
वृक्ष संजिवनी परिवाराच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रंगांच्या उधळणीसोबतच निसर्गाची काळजी घेण्याचा हा संदेश निश्चितच प्रेरणादायी आहे.



