इंदापूर: गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहरात (Indapur City) सुरू असलेल्या पावसामुळे अनेक मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांनी ओढ्याचे स्वरूप धारण केले आहे. खड्डे आणि रस्त्यांवरील पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ठिकाणी गुडघाभर, तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचले आहे. यामुळे सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, तर अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे
खड्ड्यांमुळे वाहन चालवणे झाले धोकादायक
शहरातील वर्दळीच्या मार्गांवर रस्त्यांवरील डांबर उखडले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर रस्त्यांवरून चालणेही धोकादायक बनले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी वाहने बंद पडत आहेत, तर पाणी तुंबल्याने रस्त्याला अक्षरशः ओढ्याचे रूप आले आहे.
अपघातांची वाढती भीती
पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांवर प्रचंड चिखल आणि निसरडेपणा वाढला आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थी आणि महिलांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठी भीती वाटत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पालिकेने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास मोठा अपघात होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिक संतप्त
इंदापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, या समस्येवर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या गंभीर समस्येकडे नगरपालिका (Municipality) आणि बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे.
नागरिकांनी मागणी केली आहे की, नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते, पण तसे न झाल्याने आता तात्पुरत्या स्वरूपात तरी खड्डे बुजवून रस्त्यावरून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबेल.
इंदापूर तहसील कचेरी व नवीन नगर पालिका इमारत समोरील १०० फुटी रस्त्यावर साचलेले पाणी....
