इंदापूर, दि. ८ मार्च – शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अल्फा बाईट कम्प्युटर्स येथे चालवण्यात येणाऱ्या 'ओजस बालसंस्कार वर्ग' मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व, त्यामागील इतिहास आणि उद्दिष्टे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील तसेच देशभरातील कर्तबगार आणि प्रेरणादायी महिलांच्या जीवनचरित्राची ओळख करून देण्यात आली. महिलांनी विविध क्षेत्रांत गाजवलेली कामगिरी आणि त्यांच्या संघर्षमय वाटचालीबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना आपली मतं आणि अनुभव मांडण्याची संधी देण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी महिला सशक्तीकरण, लिंगसमानता आणि स्त्रियांच्या समाजातील भूमिकेवर आपली मतं स्पष्टपणे मांडली. त्यांच्या या मनोगतातून महिला दिनाबाबतची त्यांची जागरूकता आणि समज दिसून आली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण होण्यास मदत झाली तसेच त्यांना महिलांच्या कार्यप्रेरणादायी योगदानाची जाणीव झाली. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
