इंदापूर: दि.२८ जुलै रोजी, प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना 'आयडियल स्टडी' ॲपचे कूपन वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून मदत व्हावी आणि त्यांची परीक्षेची तयारी अधिक प्रभावी व्हावी या उदात्त उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. 'आयडियल स्टडी' ॲप विशेषतः इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आले असून, ते मराठी, इंग्रजी आणि सेमी-इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
या ॲपमध्ये धड्यांचे व्हिडिओ लेक्चर्स, विषयांनुसार नोट्स, सराव, मॉडेल पेपर्स आणि लास्ट मिनिट रिव्हीव्ह यांसारखी अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. ही वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना विषय अधिक सुलभपणे समजण्यास, नियमित सराव करण्यास आणि परीक्षेपूर्वी आत्मविश्वास मिळवण्यास मोठी मदत करतात.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रो. प्रदीपदादा गारटकर, प्रमुख पाहुणे म्हणून डीस्ट्रीक्ट ३१३१ चे बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी डायरेक्टर रो. वसंतराव मालुंजकर तसेच क्लबचे अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबाळे, सचिव रो.अप्पासाहेब बंडगर, खजिनदार रो.सुधीर शेंडे, प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूल चे व्हाईस चेयरमन श्री.इम्रान शेख, मुख्याध्यापक श्री.भिसे सर, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चे सर्वेसर्वा रो.जयवंत नायकुडे, रो.मोरेश्वर कोकरे, रो.मंदाकिनी डोंबाळे, रो.राजाराम सागर, रो.दादा काळे, रो.समीर सूर्यवंशी, रो.तानाजी दडस, रो.तात्यासाहेब वाघमारे,रो.चंद्रकांत तरंगे, सौ.राजश्री महाडिक तसेच शिक्षक उपस्थित होते. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, अभ्यासाचे प्रभावी नियोजन कसे करावे आणि परीक्षेच्या ताण-तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलने आपल्या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम विविध शाळांमध्ये राबवण्याचा क्लबचा मानस आहे. या अॅप वितरणामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून अधिक प्रभावीपणे अभ्यास करण्यास मदत होईल आणि ते अधिक आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेला सामोरे जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
