इंदापूर : शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मोदक स्पर्धा" नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. ट्रस्टच्या कार्यालयात झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी पारंपरिक व आधुनिक अशा विविध प्रकारचे मोदक सादर करत आपली कला आणि कल्पकता दाखवली. आकर्षक सादरीकरणामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली.
स्पर्धेचे परीक्षण सौ. सपना हेगडे व श्री. आदित्य राखुंडे यांनी केले. त्यांनी प्रत्येक मोदकाच्या सादरीकरणाचे व चवीचे बारकाईने निरीक्षण केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल चे अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे, तसेच ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर उपस्थित होते.
या प्रसंगी रोटरी अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबाळे यांनी सण-उत्सवांमधून भारतीय संस्कृती जपली जाते यावर भर दिला. तर ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांनी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच अशा उपक्रमांद्वारे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा, महिलांना व युवकांना प्रोत्साहन देण्याचा आणि मुलांमध्ये सर्जनशीलतेची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मोदक स्पर्धेच्या उपक्रमामुळे या उत्सवाला नवा आयाम लाभला आहे.
या कार्यक्रमास रोटरी क्लबच्या रो. मंदाकिनी डोंबाळे, रो. डॉ. प्रताप कदम, रो. छाया तरंगे, सौ. सोनाली कदम, सौ. रोहिणी बंडगर, सौ. स्नेहा टेळे तसेच ट्रस्टचे इन्चार्ज श्री. दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी श्री. सागर कांबळे, जावेद हबीब विभाग प्रमुख श्री. अमोल राउत, फॅशन विभाग प्रमुख सौ. त्रिशला पाटील, ब्युटी विभाग प्रमुख सौ. रोहिणी जाधव, तसेच केदार गोसावी व मानसी पाटील उपस्थित होते.
या यशस्वी उपक्रमाचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले. समाजातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि संस्कृतीचे संवर्धन करणे हा ट्रस्टचा उद्देश असल्याचे या प्रसंगी अधोरेखित करण्यात आले.
