उरण: उरणमधील भेंडखळ येथील एका कंटेनर यार्डमध्ये दक्षिण अमेरिकेतील दुर्मीळ बिनविषारी साप आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. परदेशातून आलेल्या एका कंटेनरमधून हा साप भारतात पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कंटेनरमधून झाला प्रवास
भेंडखळ येथील हिंद टर्मिनल यार्डमध्ये इंग्लडहून वाहनांच्या टायरचा एक कंटेनर आला होता. यार्डमधील कर्मचाऱ्यांनी कंटेनर उघडला असता, त्यांना टायरच्या मध्ये नारंगी रंगाचा एक आकर्षक साप दिसला. त्यांनी तत्काळ 'फ्रेंड्स ऑफ नेचर' (फॉन) या स्थानिक वन्यजीव बचाव संस्थेशी संपर्क साधला.
सर्पमित्रांनी केले रेस्क्यू
'फॉन' संस्थेचे सर्पमित्र जय गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या सापाचे यशस्वीपणे रेस्क्यू केले. तपासणी अंती, हा साप दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणारा 'कॉर्न स्नेक' असल्याचे निष्पन्न झाले.
कॉर्न स्नेकची माहिती
कॉर्न स्नेकला 'रेड रेंट स्नेक' असेही म्हटले जाते. ही उत्तर अमेरिकन रॅट स्नेकची एक प्रजात असून ती प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय अमेरिकेत आढळते.
हा साप पूर्णपणे बिनविषारी असून तो माणसांसाठी निरुपद्रवी आहे. उलटपक्षी, तो शेतीत पिकांचे नुकसान करणाऱ्या आणि रोग पसरवणाऱ्या उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो, त्यामुळे तो मानवासाठी उपयुक्त मानला जातो.
पुढील कार्यवाही
हा विदेशी साप कंटेनरमधून भारतात कसा पोहोचला, विशेषतः तो इंग्लडहून आलेल्या सामानात कसा आढळला, हा प्रश्न वन्यजीव अभ्यासकांना पडला आहे. मात्र, हा परदेशी प्रजातीचा असल्याने त्याला येथील नैसर्गिक अधिवासात सोडणे योग्य नाही. त्यामुळे या सापाचे पुढे काय करायचे, याबाबत वन विभाग लवकरच निर्णय घेणार आहे.
