इंदापूर: निरा-भीमा सहकारी साखर कारखाना स्थळी आदरणीय स्व. शंकरराव पाटील (भाऊ) यांच्या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदापूर यांच्या वतीने कारखान्यातील एकूण १५७ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता या शिबिराचा रीतसर शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय श्री. नवनाथ सपकाळ साहेब, मुख्य शेतकी अधिकारी श्री. महेश चंदनकर, ऊस पुरवठा अधिकारी संग्राम मोहिते आणि ऑफिस सुप्रीडेंट श्री. सुभाष घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच लेबर ऑफिसर फत्तेसिंग गोडसे, चीफ इंजिनियर पाटील साहेब, चीफ केमिस्ट यादव साहेब, लेबर सुपरवायझर अंकुश लावंड आणि केनयार्ड सुपरवायझर श्री. तौर साहेब या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले व या उपक्रमाचे कौतुक केले.
तपासणी दरम्यान कार्यकारी संचालक श्री. नवनाथ सपकाळ यांनी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. सारंगी कुंभार मॅडम यांच्याकडून चालू गाळप हंगामातील ऊसतोड मजुरांच्या आरोग्य स्थितीचा आढावा घेतला. डॉ. कुंभार यांनी माहिती दिली की, आतापर्यंत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ३० गावांमध्ये जाऊन एकूण १९८५ ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. मजुरांना त्यांच्या कार्यस्थळी जाऊन आरोग्य सेवा पुरवल्याबद्दल सपकाळ साहेबांनी समाधान व्यक्त केले.
आरोग्य पथकाने मजुरांच्या राहणीमानाबद्दल निरीक्षणे नोंदवताना सांगितले की, पावरा, भिल्ल, बारेला आणि मालचे यांसारख्या पूर्वी अप्रगत मानल्या जाणाऱ्या टोळ्या आता हळूहळू प्रगत होत आहेत. या मजुरांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असून औषधे कशी घ्यावीत, हे त्यांना समजू लागले आहे. याउलट राठोड, सोलंकी, सोनवणे, अहिरे, सानप आणि आडगळे या टोळ्यांचे राहणीमान आधीच सुधारलेले असून ते वेळेवर उपचार घेतात. स्वच्छतेअभावी होणारे खरुज, नायटा, गचकरण आणि खोकल्यासारखे आजार कायमचे दूर करण्यासाठी मजुरांना रोजच्या आंघोळीचे व स्वच्छतेचे महत्त्वही सांगण्यात आले.
हे संपूर्ण आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. सारंगी कुंभार मॅडम यांच्यासह नर्स सलोनी दुर्वे, संयोनी कासदेकर, केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण सर आणि हनुमंतराव गोफणे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्व. भाऊंच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाचे आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहेत.
