महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून तो भगवान शिव आणि पार्वती यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्री साजरी करण्याचे तीन प्रमुख कारणे आहेत.
पहिले कारण म्हणजे समुद्र मंथनातून निघालेले विष (हलाहल) भगवान शंकरांनी प्राशन करून जगाला विनाशापासून वाचवले. त्यांच्या या त्यागाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
दुसरे कारण म्हणजे शिवपुराणानुसार, या दिवशी भगवान शिव शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली.
तिसरे कारण म्हणजे एका पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा.
प्रत्येक चंद्र महिन्याचा चौदावा दिवस किंवा अमावस्येच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. एका कॅलेंडर वर्षात येणाऱ्या सर्व शिवरात्रींमध्ये जी फेब्रुवारी-मार्च महिन्यात येते, ती महाशिवरात्री सर्वात महत्त्वाची मानली जाते. या रात्री, ग्रहाचा उत्तर गोलार्ध अशा प्रकारे स्थित असतो की मानवाच्या आतली ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने जाते. हा एक असा दिवस आहे, जेव्हा निसर्ग मानवाला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर पोहोचण्यास मदत करतो. म्हणूनच महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे.

