इंदापूर : शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती पद्मताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर आणि विश्वस्त श्री. अरविंद गाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ओजस बालसंस्कार वर्गाचा पालक मेळावा आज दिनांक १ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि बौद्धिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय शंकररावजी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर संस्थेचे आरोग्य विभाग प्रमुख श्री. महादेव चव्हाण यांनी पालकांना संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि कौशल्यविकास उपक्रमांबद्दल माहिती देत ओजस बालसंस्कार वर्गाचा उद्देश स्पष्ट केला. ओजस बालसंस्कार वर्गांचे प्रशिक्षक श्री. सागर कांबळे यांनी या उपक्रमाची संकल्पना, गरज आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्याच्या महत्त्वाबद्दल पालकांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी नृत्य, कविता वाचन, गीत गायन आणि विविध सांस्कृतिक कला सादर करत आपले कौशल्य दाखवले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकून स्वतः तयार केलेली नृत्ये सादर केली. पालकांनी आपल्या मुलांना व्यासपीठ मिळत असल्याचा आनंद व्यक्त केला आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत मांडले.
संस्थेचे विश्वस्त श्री. अरविंद गाटकर यांनी अध्यक्षीय भाषण करताना पालकांना आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी बालसंस्कार वर्ग उपयुक्त ठरतील, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर,आरोग्य विभाग प्रमुख श्री. महादेव चव्हाण, संस्थेचे कार्यकर्ते श्री. हमीदभाई आतार, संस्थेचे इन्चार्ज श्री. दिपक जगताप, तसेच अनेक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदार गोसावी, अथर्व सरोदे, अभिजित तळेकर, सनी भुजबळ यांनी सहकार्य केले.
ओजस बालसंस्कार वर्ग दर शनिवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत इंदापूरमधील प्रसिद्ध संगणक प्रशिक्षण संस्था 'अल्फा बाईट' च्या हॉलमध्ये पूर्णपणे मोफत घेतले जातात.संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
