इंदापूर, दि. ३० मार्च : हिंदू नववर्षाच्या स्वागतार्थ शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने “सद्गुणांचा गुढीपाडवा ” या विशेष उपक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले.
हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आयोजित या उपक्रमात उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन ‘सद्गुणांची माला’ गुढीवर घातली. या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणादायी संदेश देण्यात आला – जीवनात सद्गुणांचा स्वीकार करून एक आदर्श आणि सुसंस्कृत समाज घडविणे हेच आपल्या परंपरांचे खरे सार आहे. गुढीपाडव्याच्या सणात प्रथा आणि परंपरा असतात, परंतु या उपक्रमात गुढीला विविध सद्गुणांची माला घालून त्या सद्गुणांची जाणीव करून देण्यात आली.
या सद्गुणांच्या मालेत प्रामाणिकपणा, करुणा, धैर्य, सहकार्य, सत्य, अहिंसा आणि प्रेम यांसारख्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ‘सद्गुणांचा गुढीपाडवा ’ हा केवळ एक धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने सद्गुणांचा स्वीकार करून जीवन अधिक मूल्यवान आणि प्रेरणादायी बनवण्याचा संदेश देणारा उपक्रम होता.
या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेने समाजातील प्रत्येक घटकाला आपले जीवन अधिक साधक आणि गुणकारी कसे बनवता येईल, याचा विचार करण्यास प्रवृत्त केले. मराठी नववर्षाच्या प्रारंभाचा हा शुभसंकेत सकारात्मक विचारांचा प्रसार करणारा ठरला. या उपक्रमामुळे उपस्थितांना जीवनात सद्गुणांचा समावेश करून एक आदर्श समाज निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर, सौ. मीनल रंजनकर, श्री. यश रंजनकर, सौ. सई रंजनकर, इन्चार्ज दिपक जगताप, अमोल राऊत, सागर कांबळे, त्रिशाला पाटील, केदार गोसावी तसेच संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.
