इंदापूर : ओजस बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून इंदापूरच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिकाशी थेट संवाद घडवून आणणारे एक प्रेरणादायी विशेष विज्ञान सत्र आज उत्साहात पार पडले. या उपक्रमाचे आयोजन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री तुषार रंजनकर, व विश्वस्त श्री अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरला.
सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोगांची थेट प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामध्ये मायक्रोस्कोप, हृदयाची प्रतिकृती, चुंबकीय खेळणी, तसेच शालेय पातळीवरील इतर अनेक रोचक विज्ञान संकल्पनांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी हे प्रयोग हाताळले, निरीक्षण केले आणि विज्ञानामागील गंमत अनुभवली.
यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन लाभले ते डॉ. शरद रामचंद्र कांबळे यांचे — जे मूळचे महाराष्ट्रातील असून त्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून Life Sciences (Medical Biosciences & Pharmaceutical Engineering Sciences) मध्ये Ph.D. पूर्ण केली आहे. सध्या ते इंग्लंडमधील Azotic Technologies या आंतरराष्ट्रीय जैवतंत्रज्ञान कंपनीत Senior Scientist – Microbiologist म्हणून कार्यरत आहेत. नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्मजीवांवरील त्यांच्या संशोधनामुळे जैविक शेतीच्या क्षेत्राला नवे दिशा मिळाली आहे. त्यांनी UK Research and Innovation – GCRF सारख्या संस्थांमधून आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे.
गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषय अगदी सोप्या, सहज आणि समजण्याजोग्या भाषेत समोर ठेवला. “हात तपासा, दिसत नसले तरी त्यावर सूक्ष्मजीव असतात” या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी सूक्ष्म जीवांची उपस्थिती समजावून सांगितली. त्यांनी विज्ञानाचा वापर दैनंदिन आयुष्यात कसा करता येतो, हे सहज उदाहरणांनी स्पष्ट केले. त्यांच्या बोलण्यातली आत्मीयता, नम्रता आणि स्पष्टता विद्यार्थ्यांना खूप भावली.
सत्रात सुरुवातीला डॉ. कांबळे यांची ओळख करून देताना संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री.सागर कांबळे यांनी ‘आपटी ते इंग्लंड’ या त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाची माहिती दिली. ग्रामीण भागातून येऊनही दृढ इच्छाशक्ती, चिकाटी आणि शिक्षणाच्या जोरावर जागतिक स्तरावर पोहोचता येते, हे विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आत्मीयता, आत्मविश्वास आणि मोठं स्वप्न पाहण्याची प्रेरणा निर्माण झाली. ओजस बालसंस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांसोबतच इंदापूर शहरातील इतर शाळांतील मुलांनीही यात सहभाग घेतला.
अशा प्रकारच्या सत्रांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान, संशोधन आणि जागतिक विचारप्रवाहांशी थेट जोडण्याची संधी मिळते. हे सत्र केवळ एक शैक्षणिक सत्र नव्हते, तर एक स्वप्नांना दिशा देणारी जागर यात्रा होती.
