इंदापूर : शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांच्या माध्यमातून आज अल्फा बाईट कॉम्प्युटर्स येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात Accenture जपानच्या मॅनेजिंग डायरेक्टर, सुजाता कोळेकर यांनी जपानमधील भाषा, तंत्रज्ञान आणि शिक्षण व्यवस्थेवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर यांनी सुजाता कोळेकर यांचे स्वागत केले. त्यानंतर कोळेकर यांनी जपान देशातील आधुनिक तंत्रज्ञान आणि तेथील शिक्षण प्रणालीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जपानमध्ये तंत्रज्ञानाला किती महत्त्व दिले जाते आणि तेथील शिक्षण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी कसे तयार करते.
यावेळी बोलताना सुजाता कोळेकर यांनी जपानी भाषेचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, जपान आणि भारत यांच्यातील व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध वाढत आहेत. त्यामुळे जपानी भाषा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन्ही देशांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यांनी जपानी भाषा शिकण्याचे फायदे आणि करिअरच्या विविध वाटांविषयी सखोल माहिती दिली. कोळेकर यांनी जपानमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि प्रक्रिया यावरही प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना जपानमधील जीवनशैली आणि कामाच्या संस्कृतीची माहिती दिली, ज्यामुळे त्यांना भविष्यात निर्णय घेणे सोपे जाईल. भारतातील जपानी कंपन्यांमध्ये तसेच जपानमध्ये जाऊन नोकरी कशी मिळवावी, यासाठी काय तयारी करावी, याबाबत त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
या ऑनलाईन व्याख्यानात अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आपल्या शंकांचे निरसन केले. सुजाता कोळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सहज आणि सोप्या भाषेत उत्तरे दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन दिशा दाखवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. अल्फा बाईट कॉम्प्युटर्सच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या व्याख्यानाचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत व सुजाता कोळेकर यांच्या मार्गदर्शनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी लवकरच जपानी भाषेचे कोर्स अत्यंत अल्प दरात सुरु करण्यात येणार आहेत, तरी विद्यार्थ्यांची त्याचा लाभ घ्यावा.

