इंदापूर शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. संदेश शहा यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या होमिओपॅथी कौन्सिलचा प्रतिष्ठेचा होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनेमन जीवनगौरव पुरस्कार २०२५ नुकताच जाहीर झाला. त्यांच्या दीर्घकालीन सेवा, वैद्यकीय क्षेत्रातील अमूल्य योगदान आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने त्यांना हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
या सन्मानानिमित्त शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर व अल्फा बाईट कम्प्युटर्स इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य जाहीर सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात उपस्थितांनी डॉ. शहा यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या यशाचे कौतुक केले. डॉ. शहा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून होमिओपॅथीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. दुर्गम व ग्रामीण भागांतील सामान्य लोकांपर्यंत सुलभ व सस्ती आरोग्यसेवा पोहचवण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. तसेच होमिओपॅथीच्या प्रसारासाठी त्यांनी निरंतर प्रयत्न केले असून ही चिकित्सा पद्धती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे.
फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरतेच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही डॉ. शहा यांनी मोठे योगदान दिले आहे. अनेक सामाजिक संस्थांशी ते सक्रियपणे जोडले गेले आहेत. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे व सेवाभावामुळे त्यांनी समाजहितासाठी विविध उपक्रम राबवले आहेत, ज्याचा लाभ हजारो लोकांना झाला आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत शासनाने त्यांना जीवनगौरव या नामांकित पुरस्काराने गौरवले आहे. डॉ. शहा यांच्या सन्मान समारंभासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर, विश्वस्त श्री. अरविंद गारटकर, संस्थेचे देणगीदार श्री. वसंतराव मालुंजकर, तसेच आरोग्य संदेश चे सचिव श्री. जमीर शेख उपस्थित होते. या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. शहा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.
या समारंभात डॉ. शहा यांच्या पत्नी डॉ. राधिका शहा याही उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून डॉ. शहा यांचा संघर्ष उलगडून सांगितला. त्या म्हणाल्या की, “डॉ. शहा यांनी लहानपणी अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज दिव्याखाली अभ्यास केला. अनेकदा मंदिरातील दिवाबत्ती करून आपला खर्च भागवला आणि तरीही त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले. त्यांची जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांवरील विश्वास यामुळेच ते आज या शिखरावर पोहोचले आहेत.”
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संदेश शहा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करत प्रेरणादायी विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले, “कोणताही मनुष्य आयुष्यभर शिकतच असतो. ज्याचे शिक्षण थांबते त्याची प्रगतीही थांबते. म्हणूनच माणसाने आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकत राहाव्यात. शिक्षण हे केवळ शाळेपुरते मर्यादित नसून ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गरजेचे असते.”
या सन्मान सोहळ्यामुळे इंदापूर शहरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. हा पुरस्कार केवळ डॉ. शहा यांच्याच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांचा, इंदापूर शहराचा आणि होमिओपॅथी वैद्यकीय क्षेत्राचा गौरव ठरला आहे.

.jpeg)

