भूम (प्रतिनिधी):
तालुक्यातील 'वाल्हा' येथे एक अत्यंत विचित्र आणि भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिवेगाने जाणाऱ्या एका हुंडाई क्रेटा कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट रस्ता सोडून एका घराची भिंत तोडून आत घुसली. या अपघातात घरात असलेली एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
व्हिडिओ पहा
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाल्हा येथील रहिवासी लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या घरामध्ये हा भीषण अपघात झाला. कारचा वेग इतका प्रचंड होता की, ती रस्त्यावरून भरकटत थेट कुलकर्णी यांच्या घराची पक्की भिंत फोडून आत शिरली. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून, घरात उपस्थित असलेली महिला या अपघातात गंभीररीत्या जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
एअरबॅग्जमुळे वाचले चालकाचे प्राण
हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढील भाग आणि घराची भिंत यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, सुदैवाने अपघातग्रस्त 'हुंडाई क्रेटा' कारमधील एअरबॅग्ज (Airbags) वेळेवर उघडल्या. यामुळे कारचालक आणि त्यामधील प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. 'वाहने मर्यादित वेगाने चालवावीत,' असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात असतानाही, अशा अतिवेगामुळे होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
