विशेष प्रतिनिधी पुणे: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. राज्यातील अवैध आणि आरोग्याला घातक ठरणाऱ्या धंद्यांविरुद्ध त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, गुटखा आणि पानमसाला माफियांचे धाबे दणाणले आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने राज्यातील पाच मोठ्या विभागांमध्ये एकाच वेळी मोठी कारवाई करत गुटखा विक्रेत्यांना मोठा दणका दिला आहे.
पाच विभागांत एकाच वेळी धडक कारवाई
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी तत्परता दाखवत बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या पाच विभागांमध्ये एकाच दिवशी छापे टाकले. प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याची विक्री करणाऱ्या आणि शासनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या विविध आस्थापनांवर ही 'सर्जिकल स्ट्राईक' करण्यात आली.
३३ आरोपी गजाआड; २८ दुकाने सील!
या व्यापक मोहिमेदरम्यान एफडीएच्या पथकांनी एकूण ३३ आरोपींना अटक केली असून, नियमभंग करणाऱ्या २८ आस्थापनांना तात्काळ सील ठोकले आहे. या धडक कारवाईत विविध ठिकाणांहून तब्बल ६ लाख १७ हजार रुपये किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या विविध कडक कलमांखाली गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
'नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही' - तुकाराम मुंढे
या मोठ्या कारवाईनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना आणि अवैध विक्रेत्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.
"जनतेच्या आरोग्याशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि अशी कोणतीही गोष्ट अजिबात खपवून घेतली जाणार नाही. शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. यापुढेही जर कुठे भेसळ किंवा प्रतिबंधित पदार्थांची विक्री आढळली, तर यापेक्षाही कठोर पावले उचलली जातील," असा सज्जड दम मुंढे यांनी दिला आहे.
तक्रारींसाठी येणार नवीन 'ॲप' आणि 'टोल फ्री' क्रमांक
नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने पुढचे पाऊल उचलले आहे. अन्न आणि औषधांच्या दर्जाबाबत ग्राहकांना थेट तक्रार करता यावी, यासाठी लवकरच एक नवीन मोबाईल ॲप आणि टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. कोणत्याही खाद्यपदार्थाच्या किंवा औषधाच्या दर्जाविषयी शंका आल्यास नागरिकांनी न घाबरता आपले नाव, पत्ता आणि संबंधित ठिकाणाची अचूक माहिती देऊन प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही मुंढे यांनी केले आहे.

