इंदापूर – शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी खास आयोजित करण्यात आलेला ‘क्रीडारंग – कला आणि क्रीडा महोत्सव २०२५’ येत्या २० एप्रिल २०२५ पासून भव्य स्वरूपात सुरू होणार आहे. इयत्ता ७ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव खुला असून, त्यांना कला, क्रीडा आणि बौद्धिक क्षमतेची विविध रूपं अनुभवता येणार आहेत.
या महोत्सवात एकूण १२ प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, त्या विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करतील. कला व बौद्धिक गटात – निबंध लेखन, चित्रकला, रंगोळी, मेहंदी, हस्ताक्षर, वक्तृत्व, गीत गायन, अभिवाचन, प्रश्नमंजुषा आणि बुद्धिबळ यांसारख्या स्पर्धांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या लयबद्धतेला चालना देण्यासाठी नृत्य स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे, विशेष म्हणजे ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात घेतली जाणार आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना सहज सहभागी होता येईल. याशिवाय मैदानी खेळाच्या माध्यमातून संघभावना आणि स्पर्धात्मकतेचा अनुभव देणारी क्रिकेट स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. ‘क्रीडारंग’ हा महोत्सव केवळ स्पर्धांचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, संवाद कौशल्य, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ ठरणार आहे. अभ्यासाच्या जोडीने अशी स्पर्धात्मक संधी मिळाल्यास विद्यार्थी मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक समृद्ध बनतात.
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. नोंदणीसाठी अल्पा बाइट कॉम्प्युटर्स, इंदापूर तसेच शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट कार्यालय, इंदापूर येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी मोबाइल क्रमांक: ७०५८३३३०३३ वरही संपर्क साधता येईल. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन ‘मौज, मजा, मस्ती… आणि बरंच काही’ अनुभवण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

