टेक्सास येथील ‘कोलॉसल बायोसायन्सेस’ या कंपनीने तीन डायर वुल्फसारख्या पिल्लांचा जन्म घडवून आणल्याची घोषणा केली आहे. या पिल्लांची नावे 'रोम्युलस', 'रेमस' आणि 'खलीसी' अशी ठेवण्यात आली आहेत.
शास्त्रज्ञांनी हजारो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायर वुल्फचे जुने हाडे आणि दात शोधून त्यातून डीएनए मिळवला. त्याची तुलना आजच्या सामान्य ग्रे वुल्फच्या डीएनएशी केली असता त्यामध्ये २० विशेष जनुकीय फरक आढळून आले. हे फरक CRISPR या प्रगत जनुकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रे वुल्फच्या जनुकांमध्ये बसवण्यात आले.
मात्र काही शास्त्रज्ञ या प्रयोगाबाबत साशंक आहेत. त्यांच्या मते हे खरी डायर वुल्फ प्रजाती नसून केवळ त्यांच्या दिसण्यासारखे कृत्रिमरित्या बनवलेले प्राणी आहेत. त्यामुळे या प्रयोगाच्या नैतिकतेवर आणि परिणामांवर सध्या शास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.
भविष्यातील विज्ञानासाठी नवी दिशा
या प्रयोगामुळे विज्ञानाच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. नामशेष प्रजातींना पुन्हा जिवंत करण्याच्या ‘डी-एक्स्टिंक्शन’ संकल्पनेला आता बळ मिळाले आहे. डायर वुल्फप्रमाणेच मॅमथ, डोडो आणि अन्य प्राचीन प्रजाती भविष्यात पुन्हा पृथ्वीवर दिसतील, अशी शक्यता आहे. यामुळे जैवविविधतेचे संतुलन सुधारता येईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नव्या संधी निर्माण होतील.

