इंदापूर : आज चैत्र पौर्णिमा, शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी दख्खनचे आराध्य दैवत श्री ज्योतिबा यांच्या यात्रेला सकाळपासूनच मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सोलापूर, करमाळा, माढा, टेंभुर्णी, फलटण, माळशिरस तसेच इंदापूर तालुक्यातील पंचक्रोशी आणि नगर जिल्ह्यातुन लाखो ज्योतिबा भक्त आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळपासूनच भाविकांनी ज्योतिबा मंदिर येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. मनोभावे भक्तांनी श्री ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले आणि आपल्या श्रद्धा व इच्छा व्यक्त केल्या. दिवसभर मंदिर परिसर ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच दर्शनाचा लाभ घेतला.
दुपारी ठीक ४ वाजता श्री ज्योतिबा देवाची पारंपरिक आरती झाली. यानंतर ज्योतिबाचा मानाचा घोडा सवाद्य मिरवणुकीसाठी ग्रामप्रदक्षिणेला निघाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तांच्या जयघोषात घोडा मार्गक्रमण करत असताना एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री ज्योतिबा देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा उत्सव समितीने अथक परिश्रम घेतले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरविंद वाघ, नगरसेवक गोरख शिंदे, कैलास कदम, बाबासाहेब घाडगे, गोरख कदम यांनी व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेतला. तर यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री अतुल (वस्ताद) शेटे पाटील, उपाध्यक्ष संतोष जाधव, खजिनदार पोपट उंबरे, सहखजिनदार तानाजी देशमुख, कार्याध्यक्ष अभिजीत अवघडे, अक्षय सुर्यवंशी आणि मंदिराचे पुजारी रोहित जाधव, संदिप जाधव, अश्विन जाधव, मंगेश औताडे, हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण, भारत बोराटे, बाळासाहेब उंबरे, बबन सुर्यवंशी, जोतिराम सुर्यवंशी यांनी दिवसभर स्वयंसेवकांचे काम पाहिले आणि यात्रेकरूंना आवश्यक सुविधा पुरविल्या.
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची सोय देखील व्यवस्थित पुरवण्यात आली होती, ज्यामुळे भाविकांना कोणतीही अडचण आली नाही.
एकंदरीत, चैत्र पौर्णिमेनिमित्त भरलेली श्री ज्योतिबाची यात्रा उत्साहात आणि शांततेत पार पडली. लाखो भाविकांच्या उपस्थितीने ज्योतिबा मंदिर परिसर आज भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
