इंदापूर – समाजसेवा, महिला सक्षमीकरण, ग्रामीण भागातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा हा सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने घडवलेल्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी आहे. २०१६ साली त्यांनी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि अल्पावधीतच त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली ट्रस्टने समाजसेवेच्या क्षेत्रात अनेक लक्षणीय पावले उचलली. ताईंच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण महिलांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ट्रस्टने विविध प्रशिक्षण उपक्रम राबवले – शिवणकला, सौंदर्यप्रसाधन, डिजिटल साक्षरता, इत्यादींच्या माध्यमातून सुमारे ५०० हून अधिक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. हे केवळ प्रशिक्षण नव्हते, तर त्यांच्या स्वाभिमानाची उभारणी होती.
आरोग्य या विषयालाही तितकेच महत्त्व देत पद्माताईंनी ‘शंकरराव पाटील आरोग्य केंद्रा’ची संकल्पना साकारली. ऊसतोड कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधे आणि जागरूकता मोहिमा राबवून त्यांनी आरोग्याच्या बाबतीतही समाजात नवा विश्वास निर्माण केला. अलीकडेच ‘अॅनिमिया फ्री स्कूल’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन व बीएमआय तपासणी करण्यात आली. यासारखे उपक्रम केवळ तपासण्या न करता विद्यार्थ्यांच्या पौष्टिक आहार व एकूण आरोग्याच्या दृष्टीने मूलभूत विचार मांडत आहेत. त्याचबरोबर ‘ओजस बालसंस्कार वर्गा’द्वारे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सृजनशीलता आणि मूल्याधारित व्यक्तिमत्व विकास साधण्यात येत आहे. विज्ञान प्रयोग, हस्तकला, चित्रकला, गोष्टी व नृत्य या माध्यमातून मुलांमध्ये कलात्मक आणि बौद्धिक उन्नतीचे बळ वाढवले जात आहे.
या कार्यातून पुढे ‘कोपिवरची शाळा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा जन्म झाला. ऊसतोडीसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुरू झालेल्या या संध्याकाळच्या शाळांमध्ये आज शेकडो विद्यार्थी शिकत आहेत. या उपक्रमात केवळ शिक्षणच नव्हे, तर अन्न, कपडे आणि सुरक्षिततेची हमी दिली जात आहे. त्यामुळे ही शाळा केवळ ज्ञानाची नव्हे, तर जीवनमूल्यांची गंगोत्री ठरली आहे. या मुलांच्या जीवनात आलेले बदल हे समाजात सकारात्मक परिवर्तनाचे प्रतीक ठरले आहेत. या उपक्रमाच्या यशामुळे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा लौकिक अधिकच बहरला असून, ग्रामीण भागातील शिक्षणासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.
या सर्व कार्यामध्ये पद्माताई भोसले यांचे नेतृत्व हे आशेचा किरण ठरले आहे. कोविड काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून ‘शंकरराव पाटील अक्षय शिक्षण योजना’अंतर्गत अनेक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली. याशिवाय ‘अनमोल जीवनदायिनी’ उपक्रमाद्वारे गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य मिळाले असून अनेकांचे प्राण वाचवले गेले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी, लाभार्थी आणि सर्व सामान्य नागरिक त्यांच्या कार्याची प्रशंसा करीत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पद्माताई भोसले यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ ठरले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टची वाटचाल येणाऱ्या काळातही सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

.jpg)