इंदापूर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंदापूर नगरपालिकेतील प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या कष्टकरी महिलांचा आगळावेगळा सन्मान करण्यात आला. वृक्ष संजिवनी परिवार, पतंजली योग समिती, इंदापूर शाळा क्र. १ व २ यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा प्रकल्पावर जाऊन या महिलांचा गुलाब पुष्प आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
या अनोख्या सत्काराने या महिला भगिनी भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. समाजात स्वच्छता राखण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या या महिलांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करणे आवश्यक आहे, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
वृक्ष संजिवनी परिवाराच्या सायराभाभी आत्तार आणि पतंजली योग समितीचे मल्हारी घाडगे यांनी या महिलांच्या कार्याचे कौतुक केले. रश्मीताई निलाखे, स्वाती अधटराव, वर्षा पोळ, महिला कॉन्स्टेबल माधुरी लडकत, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, देवराव मते, हमीदभाई आत्तार आणि अशोक चिंचकर यावेळी उपस्थित होते. या उपक्रमातून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान करणे गरजेचे आहे, हा संदेश देण्यात आला.
