शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट कार्यालयाच्या प्रांगणात होळी दहन संपन्न!
इंदापूर, दि. १३ मार्च २०२५ – संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयात होळी दहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या प्रांगणात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राग, द्वेष, व्यसन आणि अन्य नकारात्मक प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून त्यांच्या पोस्टर्सची होळी करण्यात आली, ज्यामधून समाजात सकारात्मकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यात आला.
या पवित्र होळी दहनाचा शुभारंभ संस्थेचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे आरोग्य केंद्राचे प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपीवरची शाळा प्रमुख श्री. भारत बोराटे, कार्यकर्ते श्री. हमिदभाई आतार तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी आणि सर्व विभागांचे विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाद्वारे वाईट विचार, वाईट सवयी आणि सामाजिक विषमता दूर करण्याचा संदेश देण्यात आला. व्यसनाधीनता, द्वेषभावना, राग आणि नकारात्मकता यांसारख्या गोष्टी समाजासाठी घातक आहेत, त्या दूर करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे, असे मत सर्वांनी व्यक्त केले.
संस्थेच्या वतीने भविष्यातही असे समाजप्रबोधनात्मक आणि विधायक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी या संदेशातून प्रेरणा घेत पुढेही समाजहितासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. या अनोख्या उपक्रमामुळे होळी केवळ एक सण न राहता, समाज सुधारनेचे प्रभावी माध्यम ठरले!
