शहाजीनगर (ता. इंदापूर): नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. गुरुवारी (दि. 13) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
1999 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. तेव्हापासून मागील 25 वर्षांपासून सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत. शेतकऱ्यांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले आहे.गेल्या 25 वर्षांमध्ये नीरा-भीमा कारखान्याने उत्कृष्ट काम करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. सध्या देशातील आणि राज्यातील साखर उद्योग अडचणीत असताना, कारखान्याच्या 46 गावातील सभासद, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी एकदिलाने सहकार्य केले.
या निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे आणि तहसीलदार जीवन बनसोडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
नेतृत्व आणि एकीचे यश:
हर्षवर्धन पाटील यांच्या कणखर नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे:
* बावडा गट: हर्षवर्धन पाटील, प्रतापराव पाटील, उमेश पाटील
* पिंपरी गट: प्रकाश मोहिते, संजय बोडके, विजय घोगरे
* सुरवड गट: महेशकुमार शिर्के, दादासो घोगरे, सुभाष गायकवाड
* काटी गट: लालासो पवार, राजकुमार जाधव, विलास वाघमोडे
* रेडणी गट: आनंदराव बोंद्रे, राजेंद्र देवकर, दत्तू सवासे
* अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्ग: राहुल कांबळे
* इतर मागास प्रवर्ग: कृष्णाजी यादव
* भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग: रामचंद्र नाईक
* ब वर्ग सभासद प्रवर्ग: भाग्यश्री पाटील
* महिला राखीव प्रवर्ग: संगीता पोळ, कल्पना शिंदे
उदयसिंह पाटील यांच्या मोठेपणाचे कौतुक आणि सन्मान:
कारखाना बिनविरोध होण्यासाठी विद्यमान संचालक उदयसिंह पाटील यांनी बावडा गटातून उमेदवारी अर्ज मागे घेतला. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अडचणीच्या काळात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एक पाऊल मागे घेणे आवश्यक होते, असे उदयसिंह पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले. हर्षवर्धन पाटील यांनी उदयसिंह पाटील यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात येईल असे जाहीर केले.
