इंदापूर | १९ एप्रिल २०२५ – शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. पद्माताई भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चॉकलेट ऐवजी चिक्की देऊया’ हा नावीन्यपूर्ण आणि आरोग्यवर्धक उपक्रम शनिवार, दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता श्री.ना.रा.हायस्कूल इंदापूर येथे आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये चॉकलेटसारख्या साखरयुक्त व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांपासून दूर ठेवून, पारंपरिक व पौष्टिक पर्यायांचा अंगीकार करणे हा होता.
इंदापूरचे प्रसिद्ध उद्योजक श्री. धरमचंद लोढा यांनी उदारहस्ते चिक्कीचा पुरवठा करून या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्यामुळे १३०० हून अधिक विद्यार्थ्यांना पौष्टिक चिक्कीचे मोफत वाटप करता आले. या उपक्रमाला सामाजिक आणि भावनिक अधिष्ठान लाभावे यासाठी सौ. अनिता लोढा व सौ. छाया धरमचंद लोढा यांनीही मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना चॉकलेट खाण्याचे दुष्परिणाम – जसे की वजनवाढ, मधुमेहाचा धोका, दातांची झीज आणि साखरेची आसक्ती – यांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर शेंगदाणा-गूळ चिक्की हा आरोग्यदायी व पारंपरिक पर्याय का निवडावा, याचे फायदेही सांगण्यात आले. ‘जशी चॉकलेटची सवय लागते, तशीच आपण चिक्की खाण्याची सवय अंगीकारू शकतो’ या विचाराने मुलांमध्ये सकारात्मक आरोग्यदृष्टीकोन निर्माण करण्यात आला. त्यांना ‘नवीन चव, नवी सवय आणि नवीन कौशल्य’ या त्रिसूत्री जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन करताना भरपूर पाणी प्या, सकाळी लवकर उठून निसर्गाचा आस्वाद घ्या, एखादे नवीन तंत्रज्ञान / स्कील शिका, संध्याकाळी पुन्हा निसर्गाच्या सानिध्याचा आस्वाद घ्या असे आवाहनही करण्यात आले. मुलांमध्ये चांगल्या सवयी लावणे आणि शिस्तबद्ध दिनचर्या विकसित करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
या कार्यक्रमासाठी श्री.ना.रा.हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.संजय सोरटे, उपमुख्याध्यापक शेख मॅडम, संस्थेचे कार्यकर्ते श्री.हमीदभाई अत्तार, बाळूमामा धाडीवाल, प्रकाश शेठ बलदोटा, बाळासाहेब क्षीरसागर, विराग लोढा, कुमारी मिली नहार, सचिन, भाऊ चौगुले, देवा मगर, अनिताताई लोढा, मोहिनीताई शिंदे, श्री. सागर शिंदे, संजयभाई शिंदे (डोनाल्ड), विश्वजीत चौगुले, संस्थेचे एडमीन श्री.दिपक जगताप, अल्फा-बाईट च्या श्रीमती.चारुशीला शिंदे, श्री.ना.रा.हायस्कूल चे सर्व शिक्षक व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


