पुणे येथील नामांकित विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मुख्य कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये "यशस्वी नोकरीसाठी दिशादर्शक" या पुस्तकाचे प्रकाशन दि. १९ एप्रिल २०२५ रोजी विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त श्री. तुषार रंजनकर यांच्या हस्ते संपन्न झाले. लेखिका डॉ. ज्योती गोगटे लिखित या पुस्तकात तरुणांना नोकरी मिळविण्याच्या प्रवासात आवश्यक असणारे सर्व टप्पे – स्व-आकलन, योग्य करिअर निवड, प्रभावी रिझ्युमे, मुलाखत तयारी, वैयक्तिक ब्रँडिंग व नेटवर्किंग – यांचे सखोल आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन दिले आहे.
'शिक्षण ते कमाई' या संकल्पनेवर आधारित पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठही विशेष दाद मिळवून गेले.रुद्र पब्लिकेशनमार्फत प्रकाशित हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, नोकरीच्या वाटचालीसाठी एक विश्वासू साथीदार ठरणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. हे पुस्तक डॉ.गोगटे यांनी समितीच्या विद्यार्थ्यांना अर्पण केले आहे.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्लेसमेंट सेलचे विशेष कौतुक करण्यात आले. या प्रकाशनप्रसंगी वि.सा.समितीचे कार्यकारी विश्वस्त श्री.तुषार रंजनकर, लेखिका डॉ.ज्योती गोगाटे,श्री.संजय अमृते, श्री.नवनाथ जगताप व सुप्रिया केळवकर उपस्थित होते.
