इंदापूर, २ मे २०२५ : सायबर सुरक्षेप्रती जनजागृती करण्यासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्यात प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. डिजिटल युगात नागरिकांनी सुरक्षिततेसंबंधी सतर्क राहावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक श्री. सुर्यकांत कोकणे, साहेब,व सह पोलीस निरीक्षक श्री शंकर राऊत साहेब, आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस स्टाफ यावेळी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला.
या नाट्यातून ओटीपी फसवणूक, बनावट सोशल मीडिया खाती, सायबर छळ, तसेच मजबूत पासवर्ड ठेवण्याचे महत्त्व यासारख्या अनेक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. सोप्या भाषेत आणि प्रभावी सादरीकरणातून नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला.
पथनाट्याचे दिग्दर्शन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे प्रकल्प अधिकारी श्री.सागर कांबळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी अतिशय तळमळीने व शिस्तबद्ध पद्धतीने सादरीकरण केले. सहभागी विद्यार्थी संस्कृती व्यवहारे, प्रगती झिंगे,श्रेया सरडे, श्रुतिका खंडागळे, तेजश्री शिद, ज्ञानेश्वरी कावडे, रवी घाडगे,रुद्राक्ष माने, हार्दिक साळवे, श्रीहरी पवार, प्रीतेश जाधव यांनी आपले संवाद, अभिनय, सादरीकरण आणि प्रेक्षकांशी संवाद यांचा उत्कृष्ट वापर करत सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.
पोलीस निरीक्षक श्री. कोकणे साहेब यांनी ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक करत सायबर सुरक्षेबाबत जनजागृती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सतर्क राहावे आणि सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तत्काळ तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ट्रस्टच्या वतीने श्री. संस्थेचे आरोग्य केंद्राचे प्रमुख श्री.महादेव चव्हाण सर ट्रस्टचे मार्गदर्शक श्री. हमीदभाई आतार, जावेद हबीब विभाग प्रमुख श्री. अमोल राऊत, ट्रस्टचे केदार गोसावी उपस्थित होते.
