इंदापूर – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर आणि अल्फा बाईट कॉम्प्यूटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने "मी मोठा होणार" या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर आणि विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि “मी मोठा होणार” ही प्रतिज्ञा घेत समाजाप्रती आपली जबाबदारी जपण्याचा निर्धार केला. विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही, लाच देणार नाही, वाहतुकीचे नियम पाळेन, मोबाईल व इंटरनेटचा मर्यादित व शहाणपणाने वापर करेन, मोठ्यांचा सन्मान करेन, पर्यावरणाचे रक्षण करेन, महिलांचा सन्मान करेन, आरोग्याची काळजी घेईन, प्रत्येक दिवशी नवे काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेन, देशभक्ती व मानवतावादी विचार जोपासेन अशा विविध सकारात्मक वर्तनाच्या संकल्पांची प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे आरोग्य विभाग प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख श्री. भारत बोराटे, अॅड्मीन श्री. दीपक जगताप, श्रीमती चारुशीला शिंदे, श्री. सागर कांबळे आणि केदार गोसावी उपस्थित होते. उपस्थित या कार्यक्रमाने भाषणात सद्वर्तन, सामाजिक भान, आणि वैचारिक शुद्धतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. “मी मोठा होणार” या घोषवाक्याने विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक विचारांची बीजे पेरली गेली असून, यामधून उद्याचे जबाबदार नागरिक घडण्यास नक्कीच मदत होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते, आणि कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रभक्तीपर घोषवाक्यांनी करण्यात आला. संस्थेने अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजवण्याचा प्रयत्न केला असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
