इंदापूर, दि. १ मे २०२५ – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांच्या वतीने "सायबर सुरक्षा" या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. हे पथनाट्य इंदापूर नगरपालिकेसमोरील प्रांगणात सादर करण्यात आले.या उपक्रमाचे नियोजन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर आणि विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमात एकूण११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अत्यंत प्रभावीपणे आपली कला सादर केली.
पथनाट्याचा उद्देश नागरिकांमध्ये सायबर गुन्हेगारीपासून संरक्षण, सुरक्षित डिजिटल व्यवहार, आणि ऑनलाईन सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनी फिशिंग, पासवर्ड सुरक्षा, सोशल मिडियावरील धोके, फसवणूक कॉल यांसारख्या मुद्द्यांवर प्रभावीपणे प्रकाश टाकला.
कार्यक्रम प्रसंगी इंदापूर नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. स्वप्निल हाके, पाणीपुरवठा प्रमुख रश्मी बारसकर मॅडम, अधिकारी श्री.अल्ताफ पठाण, श्री. सतीश तारगावकर, तसेच ट्रस्टचे ॲडमिन श्री. दिपक जगताप आणि ट्रस्टचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पथनाट्याचे दिग्दर्शन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे प्रकल्प अधिकारी श्री.सागर कांबळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी अतिशय तळमळीने व शिस्तबद्ध पद्धतीने सादरीकरण केले. सहभागी विद्यार्थी संस्कृती व्यवहारे, प्रगती झिंगे,श्रेया सरडे, श्रुतिका खंडागळे, तेजश्री शिद, ज्ञानेश्वरी कावडे, रवी घाडगे,रुद्राक्ष माने, हार्दिक साळवे, श्रीहरी पवार, प्रीतेश जाधव यांनी आपले संवाद, अभिनय, सादरीकरण आणि प्रेक्षकांशी संवाद यांचा उत्कृष्ट वापर करत सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण केदार गीसावी यांनी केले.
सदर कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकतीच इंदापूर परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावाने सायबर फसवणूक घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक खातेदारांना फ्रॉड कॉल आल्याने चिंता वाढली असून, त्यावर पथनाट्य हा जनजागृतीचा मार्ग प्रभावी ठरत आहे.
