इंदापूर: वीरश्री मालोजीराजे यांच्या गडीवर असलेल्या प्राचीन लक्ष्मी नरसिंह मंदिरात आज, रविवार दिनांक ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता नरसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुलकर्णी कुटुंबीयांनी, मंदिराचे मूळ मालक प्रमोद कुलकर्णी आणि अमोल कुलकर्णी यांनी जयंतीची जय्यत तयारी केली होती.
इंदापूर शहरातील कसबा विभागातील नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती. ह.भ.प. पांडुरंग महाराज गुरव यांचे नरसिंह जन्माचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांना सतीश बाबर सर, अशोक जाधव, बोराटे महाराज, भारत कुंभार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साथ दिली.
जयंतीनिमित्त मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. या सोहळ्याला गणेश भिसे, मामा मिश्रा, बाळासाहेब सुतार, ॲड. गिरीश शहा, प्राध्यापक कृष्णा ताटे सर, महादेव चव्हाण सर यांच्यासह अनेक मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहरातील तरुण वर्गानेही नरसिंह जयंतीच्या उत्साहात सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे जयंतीचा आनंद द्विगुणित झाला.
एकंदरीत, वीरश्री मालोजीराजे गडीवरील नरसिंह मंदिरात नरसिंह जयंती पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
