इंदापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – ए.आय.) या नव्या युगातील तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व अल्फा बाईट कम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दर सोमवारी ए.आय. क्लब आयोजित केला जातो. या उपक्रमांतर्गत आजचे सत्र विशेष ठरले, कारण यामध्ये अमेरिकेत स्थायिक झालेले इंदापूरचे सुपुत्र, आयटी तज्ज्ञ आणि उद्योजक श्री. राहुल फडतरे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. श्री. फडतरे हे सध्या अमेरिकेत आयटी प्रोफेशनल म्हणून कार्यरत असून त्यांची स्वतःची आयटी कंपनीही आहे.
या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना ए.आय. तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. भविष्यातील करिअरच्या संधी, एआयचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील उपयोग, तसेच जागतिक पातळीवर होणारे बदल यावर त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधत प्रश्न विचारले व शंका समाधान केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला होणारा हा ए.आय. क्लब उपक्रम उपयुक्त ठरत असून डिजिटल युगात नव्या संधींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करत आहे.
