इंदापूर येथील ४५० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या प्राचीन विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या पावन दिवशी पारंपरिक विधीनुसार अभिषेक व पूजन सोहळा संपन्न झाला. या मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्ती या स्वयंभू असून, भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. सकाळी पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत मंगल पूजा, अभिषेक आणि आरती करण्यात आली.
तसेच, आषाढी एकादशीच्या निमित्ताने इंदापूर येथील गोसावी विठ्ठल मंदिरात दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी एक भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शारदा स्वरांजली अकॅडमी व मनाली नृत्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात "कानडा राजा पंढरीचा..." अभंगवाणी व "नृत्यभक्ती" हा कथ्थक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अभंगवाणीने झाली.
"कानडा राजा पंढरीचा..." या सादरीकरणात सौ. शारदाताई नागपूरे (संगीत विशारद), कु. अंजली जाधव, सौ. सखुबाई राऊत, कु. शामा घासकाटू आणि कु. कार्तिकी कारंडे यांच्या सुमधुर गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना तबल्यावर श्री. दिनकर गोसावी, हार्मोनियमवर श्री. बाळासाहेब कांबळे आणि पखवाजवर केदार गोसावी यांनी साथ दिली. यानंतर ‘नृत्यभक्ती’ या सादरीकरणात मनाली नृत्यालय, इंदापूरच्या कु. स्नेहा नागपुरे, कु. श्रद्धा नागपुरे, कु. स्वरा जोशी, कु. चैत्रा ओंकार आणि कु. श्रीनिधी अरकिले यांनी कथ्थक नृत्यातून विठ्ठलभक्तीचा अनुपम आविष्कार सादर केला. नृत्य व संगीतातून विठ्ठलनामाचा गजर मंदिर परिसरात दुमदुमून गेला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.प्रदीप(दादा)गारटकर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी आयोजकांकडून उपस्थित सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले. "विठ्ठलभक्तीचा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यशस्वीपणे पार पडावा, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना" असे आयोजकांनी सांगितले.

