मुस्लिम कालगणनेनुसार पहिला महिना असलेला मोहरम, चंद्रदर्शनानंतर सुरू होतो आणि दहा दिवस चालतो. या दहा दिवसांमध्ये विविध धार्मिक विधी पार पडतात. सातव्या दिवशी सवारी पंजांची फातेहखानी होऊन त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा शहरात ठाकर गल्ली, कसबा, कुरेशी मोहल्ला, बागवान गल्ली, सातपुडा आणि शेख मोहल्ला या ठिकाणी एकूण ४२ पंजांची स्थापना करण्यात आली होती.
तसेच, इमाम हसन आणि हुसेन यांच्या प्रतिकृती म्हणून बागवान गल्ली, सातपुडा, शेख मोहल्ला, कसबा या चार ठिकाणी ताबूत बसवण्यात आले होते. यापैकी शेख मोहल्ला (मोठा भाऊ) आणि कसबा (छोटा भाऊ) येथील ताबूतांना विशेष महत्त्व आहे. मोहरमच्या नवव्या आणि दहाव्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असते. नवव्या दिवसाला 'कत्तल की रात' असे म्हटले जाते. या दिवशी शहरातील प्रथम मानाची ठाकर गल्ली सवारी इतर ठिकाणच्या सवाऱ्यांना भेटीसाठी निघते. हा भेटीचा कार्यक्रम पहाटेपर्यंत सुरू असतो.
दहाव्या दिवशी ताबूतांच्या शाही मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीतील मुख्य आकर्षण म्हणजे शेख मोहल्ला ताबूत आणि कसबा ताबूत यांची डावी-उजवी म्हणजेच 'गळाभेट'. हा अविस्मरणीय प्रसंग डोळ्यांत साठवण्यासाठी आणि दर्शनासाठी आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी नेहरू चौकात मोठी गर्दी केली होती. या प्रसंगातून हिंदू-मुस्लिम एकतेचे एक सुंदर आणि प्रेरणादायी चित्र अनुभवायला मिळाले.
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने या शाही मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे, मार्गदर्शक हमीद भाई आतार, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अविनाश नाना कोथमीरे, महादेव चव्हाण सर, भारत बोराटे सर आणि फकीर भाई पठाण यांच्यासह अनेकांनी ताबूतांना शेरा घालून स्वागत केले. त्यानंतर बाजारपेठेतून शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले भाविक "हायदोस्त धुला व या हुसेन या हुसेन" असा जयघोष करत होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
