लोणी देवकर, ०७/०७/२०२५: महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला जगात नवसंजीवनी देत, लोणी देवकर येथील आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकादमीची शिष्या पैलवान वैष्णवी तोरवे हिने कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई चॅम्पियनशिप (Asian Championship) स्पर्धेत रौप्य पदक पटकावून भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव रोशन केले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीने सर्वत्र आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.
महाराष्ट्राच्या मातीचा कसदार वारसा
महाराष्ट्राला कुस्तीची मोठी आणि वैभवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा जपण्याचे आणि पुढे नेण्याचे काम अनेकजण निष्ठेने करत आहेत. याच परंपरेचा एक भाग म्हणून, महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सरपंच तोरवेयांच्या दूरदृष्टीने आणि पैलवान प्रकाश कोळेकर व बापू कोळेकर यांच्या सहकार्याने लोणी देवकर येथे आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकादमीची स्थापना करण्यात आली. 'महाराष्ट्रातील महिला कुस्तीचा विकास व्हावा' हेच या अकादमीचे मुख्य ध्येय आहे. आज याच अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या वैष्णवी तोरवेने भारताची आणि महाराष्ट्राची माती किती कसदार आहे, हे जगाला दाखवून दिले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव
किर्गिस्तान येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवीने अत्यंत प्रभावी खेळ दाखवत द्वितीय क्रमांक पटकावला आणि आपल्या देशाचा गौरव वाढवला. जपानच्या खेळाडूविरुद्ध झालेला अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होता. विजयाने थोडी हुलकावणी दिली असली तरी, कोणत्याही मोठ्या जागतिक स्पर्धेचा अनुभव पाठीशी नसतानाही वैष्णवीने मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. तिच्या या यशाने ग्रामीण भागातील मुलींना कुस्ती क्षेत्रात येण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली आहे.
अकादमीच्या ध्येयाला पहिले यश
सरपंच तोरवे साहेब यांनी केवळ स्वतःच्या मुलीसाठीच नव्हे, तर इतर अनेक मुलींनाही खेळात यश मिळावे या उदात्त हेतूने आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकादमी सुरू केली होती. आज वैष्णवीच्या रूपाने या अकादमीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले मोठे यश मिळाले आहे. हे तर फक्त यश मिळवण्याची सुरुवात आहे, अजून अनेक खेळाडू या अकादमीतून घडणार आहेत. यासाठी पैलवान प्रकाश कोळेकर आणि बापू कोळेकर हे अविरत कष्ट घेत आहेत. येत्या काळात या अकादमीमधील खेळाडू ऑलिंपिक स्पर्धेतही चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. वैष्णवीने मिळवलेले यश हे अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देणारे आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
वैष्णवीने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या श्री. अमोल तोरावे, मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक पैलवान प्रकाश कोळेकर, बापू कोळेकर आणि समाधान खांडेकर यांच्या वरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अकादमीतील खेळाडूंनी अशा अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवावे आणि भारत देशाचे नाव सातासमुद्रापार न्यावे, अशी अपेक्षा सर्व ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

.jpeg)