'उन्मेष कौशल्य महोत्सव २०२५' चे उद्घाटन नुकतेच इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. ग्रामीण भागातील युवक, महिला आणि नवउद्योजकांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम, गेल्या वर्षीच्या यशानंतर पुन्हा एकदा नव्या उत्साहात संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या दहा दिवसांच्या कालावधीत हा महोत्सव होणार असून, ग्रामीण भागातील लोकांना प्रत्यक्ष उपयोगी पडतील अशी ३२ हून अधिक कौशल्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. नाममात्र शुल्कात उपलब्ध असलेल्या या कार्यशाळा, ग्रामीण विकासाला गती देण्याच्या ट्रस्टच्या ध्येयाचा एक भाग आहेत.
हा महोत्सव खास ग्रामीण गरजा लक्षात घेऊन तयार केला आहे. यातील कार्यशाळांमध्ये सौंदर्य आणि फॅशन, तंत्रज्ञान आणि हस्तकला यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे या कार्यशाळांमुळे लोकांना त्यांच्या आवडीनुसार कौशल्ये निवडता येतात आणि त्यातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळते.
डिजिटल युगाची गरज ओळखून, या महोत्सवात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळांचाही समावेश आहे. या कार्यशाळांमुळे लोकांना डिजिटल साक्षरता मिळेल आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढतील. याशिवाय, केक मेकिंग, नथ मेकिंग, ज्वेलरी मेकिंग यांसारख्या हस्तकलेच्या कार्यशाळांमुळे पारंपरिक कौशल्यांचे जतन होईल आणि लोकांना कलात्मक पद्धतीने अर्थार्जनाचे मार्गही उपलब्ध होतील.
या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर, कार्यकर्ते श्री. हमीदभाई अत्तार आणि कोपिवरची शाळेचे प्रमुख श्री. भारत बोराटे, इन्चार्ज श्री.दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी श्री.सागर कांबळे, जावेद हबीब विभाग प्रमुख श्री.अमोल राउत, फाशन विभाग प्रमुख सौ.त्रिशाला पाटील उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदार गोसावी, सौ.रोहिणी जाधव, भारत माने, अश्लेषा बेंद्रे, वैष्णवी गुजर यांनी प्रयत्न केले.
गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही हा महोत्सव यशस्वी होईल आणि ग्रामीण तरुणांना आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रवासात तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. हा महोत्सव फक्त कौशल्यांचे प्रशिक्षण देत नाही, तर ग्रामीण समुदायाला एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करण्याची संधीही देतो.

