इंदापूर, १५ ऑगस्ट २०२५: कासारपट्टा येथील प्राचीन श्रीकृष्ण मंदिरात शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोसावी परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला.
सन १२९० पासूनचे ऐतिहासिक महत्त्व असलेले हे मंदिर गोसावी परिवाराच्या मालकीचे असून, मोहन गोसावी, महेश गोसावी आणि मुकुंद गोसावी यांच्याकडून प्रत्येक वर्षी जन्माष्टमीनिमित्त कार्यक्रमांची आखणी केली जाते. यावर्षी, दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या सात दिवसांच्या कालावधीत मंदिरात अखंड वीणा आणि पारायण सुरू होते. नित्यनेमाची पूजा आणि अभिषेकानंतर अष्टमीच्या दिवशी विशेष महाअभिषेक करण्यात आला.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, इंदापूर यांच्या सहकार्याने गेली चार वर्षांपासून परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने केंद्रातील महिला आणि पुरुष सेवेकरी श्री गीताई पठण सेवा देत आहेत. या उपक्रमाचे नियोजन केंद्राचे प्रमुख श्री. प्रदीप भगत यांनी केले. या निमित्ताने श्रीकृष्ण स्तोत्रांचे पठणही करण्यात आले.
उत्सवासाठी संपूर्ण मंदिर भव्यदिव्य पद्धतीने सजवण्यात आले होते. श्री. यादव यांनी मंदिराला पताका, फुलांचे हार आणि आकर्षक लाइटिंग लावून एक मनोहारी रूप दिले. रात्री १० ते १२ या वेळेत ह.भ.प. ॲड. शेषांगर महाराज बोबडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांना साथ ह.भ.प. खुशाल महाराज कोकाटे यांनी दिली.
कीर्तनानंतर मोहन गोसावी यांनी श्रीकृष्ण जन्माचा पाळणा गायन केला. त्यानंतर माऊली, तुकाराम, पांडुरंग आणि श्रीकृष्णाच्या आरत्या झाल्या. यावेळी गुलालाची आणि फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले. पंचपदी झाल्यावर वीणा ठेवण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
या सोहळ्याला महादेव चव्हाण, अशोक राऊत, गंगाराम बनसोडे, मोहन शिंदे यांच्यासह कासारपट्टा भागातील तरुण वर्ग आणि शहरातील असंख्य पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री २ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. जन्माष्टमीनंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
