इंदापूर: मंगळवार, २३/०९/२०२५ रोजी शंकरराव जावडेकर ट्रस्टच्या वतीने कांदलगाव केंद्रातील १२ शाळांमधील ५१० विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. इंदापूरचे समाजसुधारक, शिक्षण पितामह गुरुवर्य शंकरराव जावडेकर यांच्या नावाने सुरू असलेल्या या उपक्रमासाठी पद्माकर जावडेकर (बेंगळूर) यांचे विशेष सहकार्य लाभले.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
यावेळी वाटप करण्यात आलेली पुस्तके खास करून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहेत. त्यातील शब्दांचा आकार मोठा असल्याने विद्यार्थ्यांना वाचायला सोपे जाते. या पुस्तकांमध्ये चित्रे, गोष्टी, तसेच संतांची, देशभक्तांची आणि समाजसुधारकांची माहिती समाविष्ट आहे. यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देण्यात आला आहे.
या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम
कांदलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख, जि. प. प्राथमिक शाळा, बाभुळगावचे मुख्याध्यापक शहाजी पोफळे, उपशिक्षक तुकाराम जाधव, वैशाली बोराटे, तसेच भारत उंबरे, प्राचार्य अरविंद गारटकर, महादेव चव्हाण, भारत बोराटे आणि हनुमंत गोफणे यांच्या हस्ते हा पुस्तक वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल आणि ज्ञानाचा प्रसार होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यापुढेही शंकरराव जावडेकर ट्रस्टच्या वतीने गरीब, हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन मदत केली जाईल, असे प्राचार्य अरविंद गारटकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमात कांदलगाव केंद्रातील जि. प. प्राथमीक शाळा कांदलगाव, कोळेकर वस्ती, गायकवाड शिद वस्ती, चोरमले वस्ती, जाधव भगत वस्ती, तोबरे वस्ती, देवकर वस्ती, महादेव नगर, शहा, सरडेवाडी, हिंगणगाव, या सर्व शाळांना पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळी शिक्षक आप्पासाहेब जाधव, रामकृष्ण निंबाळकर, वंदना आगळे, गीतांजली दीक्षित, स्वाती नरोटे, अश्विनी बादल, पल्लवी पवार, मैनुद्दीन मोमीन, गणेश मोरे, सुवर्णा कांबळे, इशरत मोमीन, शफिक शेख, शोभा चंदनशिवे, ज्योती गोसावी, मोहनलाल पवार, शशिकांत कावळे, पवार मॅडम, कवडे सर, तनपुरे सर, सचिन गुरव, आश्विनी हेगडे, स्वप्निल धस, माधुरी कागदे, सुजाता बादगुडे, संदीप तण्याळकर आदी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
