प्रतिनिधी - नितीन क्षीरसागर
कालठण : इंदापूर तालुक्यातील मौजे कालठण क्रमांक एक येथे नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. उत्सवाचे औचित्य साधून संघर्ष मित्र मंडळ व शिवछत्रपती मित्र मंडळाने धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. संघर्ष मित्र मंडळाने धार्मिक परंपरा कायम ठेवत कुरकुंभ येथुन ज्योत आणली तसेच शिवछत्रपती मित्र मंडळाने करमाळा येथुन देवीची ज्योत आणुन मुर्तीची प्रतिष्ठापना केली. घटस्थापने दिवशी शिवछत्रपती मित्र मंडळाने आणलेल्या ज्योतीची व मुर्तीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात तोफांच्या सलामीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वरुणराजाने हजेरी लावून उत्सवात वेगळाच आनंद निर्माण केला.
नवरात्र उत्सव साठी संघर्ष मित्र मंडळाने सिकंदर मंडप बीजवडी यांच्या मार्फत विद्युत रोषणाई केली तसेच शिवछत्रपती मित्र मंडळाची विद्युत रोषणाई हर्षल मंडप कालठण यांनी केली. नवरात्र उत्सवासाठी दोन्ही मंडळाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संघर्ष मित्र मंडळाने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, त्याचप्रमाणे शिवछत्रपती मित्र मंडळाने खास महिलांसाठी होम मिनिस्टर, गरबा, दांडिया तर युवा वर्गासाठी लेझीम नृत्य तसेच सामाजिक प्रबोधनपर श्री. लक्ष्मण आसबे सर यांचे सामाजिक विषयावर व्याख्यानआयोजित केले आहे. नवरात्र उत्सव काळात दोन्ही मंडळाकडून देवीच्या प्रांगणात धार्मिक परंपरा कायम राखत आराधी गीत, गोंधळ गीत व आरतीचे कार्यक्रम साजरे होत आहेत.
नवरात्र उत्सवाच्या शेवटी दोन्ही मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दसरा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली.
