प्रतिनिधी प श्री. गणेश धनावडे
कळंब (ता. इंदापूर, जि. पुणे): येथील श्री विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या सह. प्राध्यापिका, कु. राजलक्ष्मी शंकरराव रणसिंग यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. नेट (NET) आणि सेट (SET) या दोन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल, त्यांचा राज्याचे कॅबिनेट कृषी मंत्री श्री. दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कु. राजलक्ष्मी रणसिंग यांनी ॲनिमल सायन्स या विषयात राष्ट्रीय पातळीवर नेट (NET) परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून १०२ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच, त्यांनी पीएचडीसाठी आवश्यक असलेली जेआरएफ (JRF) पात्रताही मिळवली आहे. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल, इंदापूर तालुक्याचे सुपुत्र आणि राज्याचे कृषी मंत्री श्री. दत्तात्रेय भरणे यांनी त्यांना सन्मानित केले.
या सत्कार समारंभादरम्यान, मंत्री महोदयांनी राजलक्ष्मी रणसिंग यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “राजलक्ष्मी यांनी मिळवलेले यश हे केवळ त्यांच्याच नव्हे, तर इंदापूर तालुक्याच्या शिरपेचातही एक मानाचा तुरा आहे. शिक्षण क्षेत्रात असे उत्कृष्ट काम करणाऱ्या तरुणांमुळेच आपला देश प्रगती करू शकतो.” यावेळी, त्यांच्या मातोश्रींनीही राजलक्ष्मी यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी कु. राजलक्ष्मी यांचे वडील श्री. शंकरराव रणसिंग, श्री. विरसिंह रणसिंग भैय्या, श्री. रामभाऊ रणसिंग, श्री. विकास रणसिंग (चेअरमन, श्रीकृष्ण वि.का.स. सेवा संस्था, निमसाखर), तसेच चि. शिवराज रणसिंग व इतर कुटुंब सदस्य उपस्थित होते. त्यांच्या या यशामुळे रणसिंग कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. राजलक्ष्मी यांच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
