इंदापूर: दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वरकुटे बुद्रुक आणि लोणी देवकर या गावांच्या शिवेवर अंदाजे २५ ते ३० एकर ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या आगीमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे. मात्र, सध्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे, साखर कारखाने बंद असल्यामुळे जळालेला ऊस तात्काळ गाळपासाठी घेऊन जाणे शक्य नाही. जळालेला ऊस लवकर गाळला नाही तर त्याचे वजन आणि साखर उतारा मोठ्या प्रमाणात कमी होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होते.
'आम्ही वर्षभर काबाडकष्ट करून ऊस वाढवला, पण एका क्षणात तो जळून गेला. आता कारखाने बंद असल्याने या जळलेल्या ऊसाचे करायचे काय? तो तसाच ठेवून दिला तर पूर्णपणे वाया जाईल,' अशी चिंताग्रस्त प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
