इंदापूर - इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर इंदापूर नगर परिषदेतर्फे मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी 'स्वीप' अंतर्गत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, नुकतेच विवाहबंधनात अडकलेल्या एका नवदांपत्याने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून इंदापूर शहरातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे कळकळीचे आवाहन केले.
डॉक्टर शुभम गाडेकर व डॉक्टर भाग्यश्री चव्हाण यांच्या लग्न समारंभाप्रसंगी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवदांपत्याने आपल्या आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात करताना, लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला. त्यांनी शहरातील प्रत्येक मतदाराला आवाहन केले की, त्यांनी नैतिकरित्या, निर्भीडपणे आपल्या मतदानाच्या अमूल्य अधिकाराचा वापर करून मतदान करावे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी आपले योगदान द्यावे.
निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक समावेशक, सुलभ आणि सहभागी करण्यासाठी स्वीप अंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी असे अभिनव उपक्रम घेतले जात आहेत.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री सुधाकर मागाडे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री रमेश ढगे यांनी देखील नवदांपत्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि इंदापूरकरांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मचारी मनोज भापकर, अल्ताफ पठाण, प्रसाद देशमुख, सुरेश सोनवणे यांनी सहकार्य केले.
नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन आगामी निवडणुकीत आपला सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
