इंदापूर, डॉ. संदेश शहा
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील श्री दत्त देवस्थान मध्ये अखंड हरिनाम सप्ताह व गुरुचरित्र पारायणाचा प्रारंभ शुक्रवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी “ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, राम कृष्ण हरी ” या हरिनामाच्या जय करण्यात आला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या हस्ते वीणा पूजनाने सप्ताहाचा शुभारंभ झाला. हा सोहळा भाविकांना अध्यात्मिक पर्वणी ठरला. यावेळी सोनाई परिवार प्रमुख दशरथ माने म्हणाले, निरा भिमा साखर कारखाना आणि दत्त देवस्थान या दोन्ही मुळे या भागाची ओळख राज्यभर पोहोचली आहे. हरिनाम सप्ताह हा ग्रामीण, शहरी भागातील वैचारिक आणि संस्कार मूल्यांचे अधिष्ठान जपणारा महत्त्वाचा उपक्रम असून देवस्थान विकास व विविध उपक्रमासाठी सोनाई परिवार सातत्याने सहकार्य करेल.
गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ म्हणाले,
दत्त देवस्थान हे अध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र असून हरिनाम, अन्नदान आणि पालखी सोहळ्यांच्या परंपरा येथे जतन होत आहेत. गुरुचरित्राच्या ज्ञानातून भक्तिभाव अधिक दृढ होतो. शहाजीनगर परिसरात दत्तनामामुळे चैतन्य निर्माण झाले आहे.” कार्यक्रमात श्रीं चे पौराहित्य गणेशकाका वाघ यांनी शास्त्रोक्त पणे केले. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, निरा भिमा कारखान्याचे संचालक ॲड. कृष्णाजी यादव, राजेंद्र देवकर, बाजार समितीचे माजी संचालक किरण बोरा, सचिन देवकर, अकलूज कारखान्याचे माजी संचालक सोमेश्वर वाघमोडे, महादेव घाडगे, नानासाहेब देवकर, तुकाराम सोनटक्के, धनाजी गायकवाड, अभिजीत देवकर, सोमनाथ मोहिते, पांडुरंग मोहिते, दगडू गायकवाड, विक्रांत गुळवे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सप्ताहातील पहाटेच्या महापूजेचा विधी उद्योजक संजय दोशी आणि माजी संचालक सचिन देवकर यांच्या कुटुंबाच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.देवस्थान तर्फे तानाजीराव गायकवाड आणि नीलकंठ मोहिते यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सायंकाळची भजन संध्या ह. भ. प. शेषांगर महाराज बोबडे यांच्या मंडळाने भक्तिरसमय वातावरणात संपन्न झाली. समारंभाचे सूत्रसंचालन निलेश धापटे यांनी तर आभार प्रदर्शन धनाजी गायकवाड यांनी मानले.

