इंदापूर, डॉ. संदेश शहा
इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना संपूर्ण ताकद दिली. त्यांना तीन संस्थांची महत्वाची पदे दिली. मात्र निवडून आल्या नंतर ते आम्हाला विसरले. त्यांना फक्त कोट च काढून द्यायचा होता. त्यामुळे माझी चूक झाली असून मी दिलगिरी व्यक्त करतो. पण आता मागची चूक तुम्ही करू नका. शहरात आपल्या मानगुटीवर बसलेले धनशक्तीचे भूत आपणा सर्वांना येत्या दोन डिसेंबर रोजी उतरायचे असून कृष्णा भीमा विकास आघाडीचा सर्वधर्मसमभावाचा चेहरा असलेल्या प्रदीप गारटकर व पॅनेल ला २१ विरुद्ध शून्य मताधिक्याने विजयी करा असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीने शहरातील शहीद भगतसिंग चौकात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कृष्णा भीमा विकास आघाडी नगराध्यक्ष
पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर व पॅनेल च्या उमेदवारांनी मतदारांना अभिवादन केले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, या निवडणुकीत एक दिवसात पॅनेल तयार झाले नसून राज्यातील २८७ नगरपरिषद निवडणुकीत इंदापूर नगरपरिषद निवडणुकीचा वेगळा पॅटर्न तयार झाला आहे. एकीकडे एक अर्धा पक्ष आहे तर दुसरीकडे सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. मंत्रिमंडळात आम्ही वीस वर्ष काम केले आहे. त्यामुळे निधी कसा आणायचा हे आम्हाला चांगले माहित आहे. तुम्हाला जर कुणी त्रास दिला तर पहिले प्रदीप गारटकर, नंतर माझे व त्यानंतर प्रवीण माने यांचे घर आहे. त्यामुळे तुम्ही निर्भय पणे मतदान करून आपले पॅनेल विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपण पक्ष नेतृत्वाकडे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला, त्यातल्या त्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यास तिकीट द्या असा माझा आग्रह होता. त्यामुळे सर्व जातीधर्मात संतुलन साधले जाणार होते, त्याचा फायदा पक्ष संघटनेस होणार होता मात्र मंत्री भरणे यांना पैसेवाला उमेदवार हवा होता. त्यांच्या आग्रहा मुळे पक्षनेतृत्वाने देखील त्यांची मागणी मान्य केली. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांचा मानसन्मान जपण्यासाठी आपण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत निवडणूक लढविण्याचे ठरवले. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपा नेते प्रवीण माने तसेच इतर पक्ष संघटनांनी मला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करून माझ्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार केले. मी सन १९९५ साली नगराध्यक्ष झाल्यानंतर इंदापूरची टपऱ्यांचे शहर ही ओळख पुसून गाळे उभे केले. शहरातील विविध रस्त्यांना राष्ट्रपुरुषांची नावे देऊन राष्ट्रप्रेम जागविले. रोजगार निर्मिती केली. मी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष व नगरसेवक करून शहराचा विकास केला. शहरात आरोग्याची मोठी समस्या आहे. शहरात एकाचा कॅन्सर ने मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या कुटुंबांनी सुमारे ७५ लाख रुपये खर्च केला. त्यामुळे शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. नागरिकांच्या मदती साठी नगरपरिषदेत नागरिक सहायता कक्ष सुरू करणार आहे. शहराचा विकास आणखी गतीने होणार आहे. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आपले कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.
