इंदापूर, डॉ. संदेश शहा
इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व सहयोगी ओंकार शुगर अँड डिस्टीलरी लिमिटेड कडून शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य देत चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याने उच्चांकी ३३५० रुपये प्रति टन ऊस दर जाहीर केला आला आहे. आता कारखान्याचा अडचणीचा काळ संपला असून, आगामी काळात कारखाना प्रत्येक वर्षी उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा कायम राखेल, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवार दि. ११ डिसेंबर रोजी दिली. महात्मा फुलेनगर, बिजवडी ( ता. इंदापूर ) येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकरी सभासद सुसंवाद कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी उच्चांकी ३३५० रुपये ऊसदर दिल्या बद्दल कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी खासदार तथा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी श्रद्धेय शंकररावजी पाटील उर्फ भाऊंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील, ओंकार ग्रुपच्या रेखाताई बोत्रे पाटील, राजवर्धन पाटील, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, बापू जामदार आदी मान्यवरांसह कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा कारखान्याचे संचालक, विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी सभासद, ऊस तोडणी कामगार, वाहतूक कंत्राटदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कारखाना उभारणीसाठी सन १९८५-८६ च्या सुमारास कर्मयोगी भाऊ यांच्या समोर अडचणी निर्माण करण्यात आल्या. तरी देखील भाऊंनी वालचंदनगर येथील खाजगी कारखाना सहकारी बनवला. सन १९९५ ला मी आमदार होऊन राज्य मंत्री मंडळात समावेश झाल्यावर तिसऱ्याच कॅबिनेट बैठकीत कारखान्याला खास बाब म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी ९.५० कोटी रुपयांचे शासकीय भांडवल मंजूर केले. त्यामधून कारखान्याचा विस्तार करण्यात आला. पुढे सन २०१२ मध्ये चेअरमन म्हणून माझ्या खांद्यावर कारखान्याची धुरा आल्यानंतर सन २०१२ ते २०१४ पर्यंत कारखान्यास काही अडचण नव्हती, कारण आपण सरकारमध्ये सत्तेवर होतो. मात्र त्यानंतर दुर्दैवाने सन २०१४,२०१९ व २०२४ ला राजकीय अडचणी आल्या. त्यावेळी विरोधक आमच्या संस्थांवर नाहक टीका करायचे. गेली ११ वर्ष आपल्याकडे राजकीय राजाश्रय नाही तरीही आपण डगमगलो नाही. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असल्याने काळजी करण्याचे कारण नाही.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आमच्या कारखान्यांची अडवणूक करायची व दुसऱ्या बाजूला आमचे वर टीका करायची, अशी दुटप्पी भूमिका विरोधक घेत होते. तुम्ही आमच्या कारखान्यावर कर्ज आहे अशी टीका करता मग तुमच्या कारखान्यावर १२ वर्षात ६५० कोटी रुपयांचे कर्ज का केले असा प्रतिसवाल करत आपलं ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याच... या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
नीरा भीमा कारखान्यास इथेनॉल कर्जासाठी २० कोटी भरा मग ५० कोटी रुपयांचे कर्ज देऊ असे सांगितले. मात्र नंतर कर्ज न देता अडवणूक केली. नंतर बँकेने आम्हाला पत्र पाठवून भविष्यकाळात नीरा भीमा कारखाना तोट्यात जाऊ शकतो म्हणून तुमचे कर्ज नामंजूर करत असल्याचे नमूद केले. आता बँकेच्या अध्यक्षांनी कारखाना उत्कृष्टपणे चालू आहे ते पहावे असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. या बँकेवर तालुक्यातून दोन संचालक आहेत, जे बिनविरोध जातात, आम्ही त्यांना तीन वेळा बिनविरोध केले. तुमची जबाबदारी नाही का? एन.सी.डी.सी. ८ टक्क्याने कर्ज देत असेल तर का जिल्हा बँक ११ ते ११.३० टक्के व्याज दर लावते, असे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर बाजार समिती निवडणुकीत सन २०१७ ला तुम्ही मतपत्रिका खाऊन निवडून आला. आता मत चोरी होते असे म्हणतात हे तर मतपत्रिका खाऊन २ ते ३ मताने निवडून आले. नाहीतर आपल्याकडेच बाजार समिती राहिली होती. मी मंत्री असताना या बाजार समितीला खास बाब म्हणून पणन कडून सबसिडी दिली. फिश मार्केट केलं, ते फक्त एकाच इंदापूरच्या बाजार समितीत आहे, त्यासाठी कायदा बदलला. आज रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून व्यापारी इंदापूर फिश मार्केटमध्ये येतात, हे आम्ही उभा केलं, २५ एकर जागा आम्ही बाजार समितीसाठी घेतली. आज बाजार समिती तुमच्या ताब्यात आहे, काय अवस्था आहे, डाळिंबाचं मार्केट बंद झाले आहे. इंदापूर खरेदी विक्री संघाची पाच दहा कोटीची प्रॉपर्टी आपण निर्माण केली. खरेदी विक्री संघात एकच माणूस नोकरीस आहे, अशा प्रकारे संस्था तुम्ही चालवताय. छत्रपती कारखाना तुम्ही चालवताय, अन आरोप मात्र दुसऱ्यावर करताय, असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी विरोधकांना लगावला. पृथ्वीराजबापू जाचक अतिशय चांगला माणूस आहे. २२ वर्षे कारखाना धुऊन खाल्ल्यानंतर आता बापूच्या गळ्यात भवानीनगर कारखाना घातलाय, तिथे अनावश्यक मोठ्या नोकर भरती मुळे पगारावर कित्येक कोटी रुपये खर्च होत आहेत. राज्याचे नेतृत्व करणारी माणसं अशी वागायला लागली तर संस्था, शेतकरी याचे काय भविष्य राहणार आहे, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केला. साखरेचा दर प्रति किलोस ४१ रुपये करावा, अशी शिफारस राज्य शासनाकडून केंद्र सरकारला करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मान्यता दिली असल्याचे सांगून त्यांनी राज्य व देशातील साखर उद्योगातील समस्या व भविष्याचा आढावा घेतला. तालुक्यात आगामी काळात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांचा साखर उद्योगाचा चांगला अभ्यास असून त्यांनी सहयोगी तत्वावर कारखाना चालवण्या साठी दिला आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे कर्मयोगी कारखाना व ओंकार ग्रुप मध्ये शेतकरी हितासाठी सहयोग निर्माण झाला असून शेतकऱ्यांना चांगला ऊस दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी गाळपास कारखान्यास चांगला प्रतीचा ऊस घातला तर चांगले गाळप होईल. त्यामुळे कोणीही आमच्या एवढा चांगला ऊस दर देऊ शकणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. कारखान्यात आपला सर्व ऊस द्या, आम्ही जास्तीत जास्त ऊस दर देऊ अशी ग्वाही बाबुराव बोत्रे पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी निरा भिमा कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील म्हणाल्या, उच्चांकी ऊस दर दिले बद्दल कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, बाबुराव बोत्रे पाटील यांचे अभिनंदन आहे. दिलेल्या उच्चांकी ऊस दरामुळे श्रद्धेय भाऊंचे शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नीरा भीमा कारखान्याचे चालू हंगामामध्ये ७ लाख मे. टन व कर्मयोगी कारखान्याचे १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस या दोन्ही कारखान्यांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन भाग्यश्री पाटील यांनी केले. प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले. यावेळी राघव व्यवहारे, राजेंद्र पवार, निलेश देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास . सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.
कृषिमंत्र्यांनी दिवाळीला शेतकऱ्यांना ऊस बिल का दिले नाही?
आम्ही कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवाळीला १०० रुपये प्रमाणे ऊस बिलाची रक्कम दिली. मात्र कृषी मंत्री असलेल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती कारखान्याच्या माध्यमातून दिवाळीला शेतकऱ्यांना ऊस बिल का दिले नाही? कृषी मंत्री असूनही तुम्हाला दिवाळीला शेतकरी का आठवला नाही? असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केला.
