इंदापूर, डॉ. संदेश शहा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात साहित्य अकादमी ( संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली ) व विद्यापीठातील मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ’२१ व्या शतकातील उर्दू नज्म’ ( कविता ) या विषयी एक दिवसीय परिसंवाद संपन्न झाला. या परिसंवादाचे उद्घाटन तसेच अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रसिद्ध उर्दू विद्वान आणि पत्रकार डॉ. मेहताब आलम ( भोपाळ ), साहित्य अकादमी ( हिंदी ) चे संपादक अनुपम तिवारी ( दिल्ली ), विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा संचालक प्रा. नागार्जुन वाडेकर हे मान्यवर उपस्थित होते. परिसंवाद उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले, भाषा संवादाचे तसेच परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. सुरुवातीपासून मनुष्याला माणुसकीपर्यंत नेणे व कायम ठेवणे या कामात भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यातही काव्याचा वाटा मोठा आहे. उर्दुसह इतर कुठल्याही भाषेतील सकस साहित्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचबरोबर सामान्य लोकांची भाषा, त्यांचे जगणे काव्य साहित्यात प्रखरपणे आले पाहिजे. कालानुरूप संगणक ते ए. आय. अशी क्रांती झाली असली तरी भारतीय सहजीवनातील विविध घटकांचा शोध घेत मांडत रहावा आणि भाषेबाबतच्या चांगल्या मूल्यांचा प्रसार करावा असे आवाहन कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी शेवटी केले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. मेहताब आलम म्हणाले, कुठलीही भाषा ही कुणा एकाची मक्तेदारी नसून जो भाषेची साधना करतो, त्याची ती भाषा असते. २१ व्या शतकात उर्दू कवितेने विचारांना व्यापकता आणि खोली दिली आहे. या शतका तील कवितेत उपेक्षित विषयांसह स्त्रीवाद, दलित आणि शेतकरी वर्गाचे प्रश्न मांडलेले दिसून येतात, हे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आदींसंबंधी उर्दू भाषेत झालेल्या कवितांचा उल्लेख करत त्यांनी २१ व्या शतका तील उर्दू कवितेचे विषय, स्वरूप आणि तंत्र यावर देखील प्रकाश टाकला.
साहित्य अकादमी ( हिंदी ) चे संपादक अनुपम तिवारी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात आधुनिक उर्दू कवितांची सविस्तर माहिती दिली. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी हिंदी व उर्दू भाषेत फार फरक नसल्याचे सांगत भाषा हृदयांना आणि माणसांना जोडण्याचे काम करत असल्याचे सांगितले. डॉ. नागार्जुन वाडेकर यांनी विद्यापीठ तसेच मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांची व विविध उपक्रमांची माहिती दिली. उद्घाटन सत्रानंतरच्या परिसंवादाचे अध्यक्षपद उर्दूच्या प्रख्यात लेखिका डॉ. सादिका नवाब सहर यांनी भूषवले. त्यातील प्रथम सत्रात स्तुती अग्रवाल, डॉ. सय्यद नूरुल अमीन आणि डॉ. अबरार अहमद यांनी तर द्वितीय सत्रात डॉ. तनवीर हसन, दानिश गनी आणि डॉ. रशीद खान यांनी उर्दू कवितेविषयीचे आपापले शोधनिबंध सादर केले. मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रशीद अशरफ खान यांनी परिसंवादाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन धम्मरत्न जावळे व रूपाली गायकवाड यांनी तर डॉ. शाहीन शेख यांनी आभार प्रदर्शन केले.
