इंदापूर, डॉ. संदेश शहा
छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेच्या हिताची विचारधारा आजच्या आधुनिक युगात देखील मार्गदर्शक ठरत आहे. महाराजांनी गनिमी कावा, धाडस, संयम, दूरदृष्टी, जनतेचा विश्वास व अठरापगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रजाहितदक्ष राजा होते, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी काढले.
बावडा ( तालुका इंदापूर ) येथे शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास ३९६ व्या जयंती निमित्त हर्षवर्धन पाटील, निरा भिमा कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, नूतन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजा व आरती करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले, राजमाता जिजाऊं पासून प्रेरणा व संस्कार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. जीवनात संकटे आली तरी त्यावर संयमाने कशी मात करावी, हे शिवचरित्रातून शिकावे. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवना मध्ये यशस्वीपणे वाटचाल करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुशल व्यवस्थापन, रणनीती, गनिमी कावा सारखी महत्त्वाची सूत्रे आजही जगामध्ये 'मॅनेजमेंट गुरु' म्हणून अभ्यासली जात आहेत. शिस्तबद्ध सैन्य व उत्कृष्ट प्रशासकीय यंत्रणेच्या जोरावर त्यांनी सामर्थ्यशाली स्वराज्य निर्माण केले. महाराजांनी राबविलेल्या धोरणांमुळेच आजही समाजिक एकोपा दिसून येत आहे. शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र समाजाला कायमच प्रेरणा व स्फूर्ती देत राहील, असे गौरोदगार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी भव्य शिवजयंती व शोभायात्रेचे उत्कृष्ट नियोजन केलेबद्दल श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील, संचालक उदयसिंह पाटील, सचिव किरण पाटील, खजिनदार उमेश सूर्यवंशी व संचालक मंडळ, प्राचार्य डी. आर. घोगरे व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मण आसबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व घटकांना सोबत घेतले. अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना त्यांनी सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केल्याने आपण आज देखील त्यांची जयंती उत्साहात साजरी करतो. शिवचरित्राचे घरोघरी वाचन, पारायण आणि आचरण करून आपला देश जागतिक पातळीवर बलशाली करणे ही काळाची गरज आहे.
यावेळी जि. पं. सदस्या निर्मला मिसाळ यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, झांज पथक तसेच लाठीकाठी या मर्दानी खेळाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित जि.पं. व पं.स. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवप्रतिष्ठान व छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ४७०० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली भव्य शोभा यात्रा गावातून काढण्यात आली. शोभायात्रा बाजारतळा वरती आल्यानंतर शिवप्रतिष्ठान बावडा व शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे पूजन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ व पंचायत समितीच्या १६ अशा नवनिर्वाचित २४ सदस्यांचा सन्मान श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी व बावडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेच्या हिताच्या स्वराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व सदस्यांनी कार्यरत राहावे, असे आवाहन देखील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्यदिव्य शोभायात्रे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रथ, छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ व अष्टप्रधान मंडळाची वेशभूषेतील विद्यार्थी, मावळ्यांच्या वेशातील घोडेस्वार विद्यार्थी, सेनापती तानाजी मालुसरे व वीर बाजीप्रभु यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराज पालखीचा सहभाग होता. लेझीम पथक, झांज पथक, तुतारी, लाठी-काठी पथक व मावळ्यांच्या वेशातील विद्यार्थी यामुळे गावातील वातावरण शिवमय झाले होते. शोभायात्रे मध्ये हर्षवर्धन पाटील सहभागी झाले होते. या शोभायात्रेची चर्चा बावडा पंचक्रोशीत रंगली.
फोटो:-बावडा येथे श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील.

