इंदापूर, डॉ. संदेश शहा.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर तसेच महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात इंदापूर महाविद्यालयापासून फेरी संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, प्रशासन कौशल्य आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख मनोगत प्रा. नामदेव पवार यांनी शिवाजी महाराजांचे राष्ट्रनिर्मितीतील कार्य व योगदान, स्त्री विषयक दृष्टीकोन, त्यांचा गनिमी कावा, सर्वधर्मसमभाव आणि स्वराज्य संकल्पनेचे विचार प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या वतीने कु. पल्लवी देवकर, कु. श्रेया मगर यांनी मनोगते व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा नामघोष करत शहरातून रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक अभिमन्यू भंडलकर, उपप्राचार्य दत्तात्रय गोळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. उत्तम माने, डॉ. राजेंद्र साळुंखे, प्रा. आत्माराम फलफले, पुरुषोत्तम साठे, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम माने यांनी केले तर आभार डॉ. तानाजी कसबे यांनी मानले.
