कळस: इंदापूरचे थोर समाजसुधारक आणि शिक्षण पितामह गुरुवर्य शंकरराव जावडेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करत, त्यांच्या ट्रस्टमार्फत आज सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी कळस केंद्रातील १९ शाळांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. श्री. पद्माकर जावडेकर यांच्या प्रेरणेतून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला असून, याचा मुख्य कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळसच्या प्रांगणामध्ये सकाळी ११.०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला कळस केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बाळासाहेब डांगे साहेब आणि जि.प. प्राथमिक शाळा कळस च्या मुख्याध्यापिका सौ.गौराबाई नवनाथ ओमासे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केंद्रातील बागवाडी, गोसावीवाडी, खर्चे वस्ती, खारतोडे वस्ती, रुई, तळे वस्ती, वायाळ वस्ती, पवारवाडी, दगडे कोकरे मारकड वस्ती, पिंपळाचा मळा, धायगुडे वस्ती, दराडे वस्ती, गावडे पानसरे वस्ती, अकोले, पिलेवाडी, बरगुडी, थोरातवाडी, माने वस्ती आणि लावंड वस्ती या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री ना.रा. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. अरविंद गारटकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही पुस्तके अतिशय उपयुक्त आहेत. केवळ पुस्तकेच नव्हे, तर पुढील शैक्षणिक वर्षात देखील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्याचा संकल्प गुरुवर्य शंकरराव जावडेकर ट्रस्टमार्फत करण्यात आला आहे." त्यांच्या या आश्वासनामुळे शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार, भारत बोराटे सर आणि हनुमंतराव गोफणे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच कळस शाळेतील शिक्षक वृंद श्री. उत्तम खारतोडे, संजय दगडे, संदिपान शिंगाडे, भालचंद्र शिंदे, श्रीमती जयश्री सरके, पल्लवी घुगे, कमलाकांत वणवे आणि विलास पानसरे यांनी नियोजनात मोलाची भूमिका बजावली. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
कार्यक्रमाची सुरुवात महादेव चव्हाण सर यांनी प्रास्ताविकातून केली, ज्यामध्ये त्यांनी ट्र्स्टच्या कार्याचा आढावा घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संजय दगडे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीमती जयश्री सरके यांनी मानले. शिक्षण क्षेत्रातील या मदतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून, सर्व स्तरांतून जावडेकर ट्रस्टचे कौतुक होत आहे.

