इंदापूर, डॉ. संदेश शहा
बावडा ( ता. इंदापूर ) व परिसरामध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या फळबागा, शेती पिकांची पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी शनिवार दि. २१ मार्च रोजी पाहणी करून शेतकऱ्यांची संवाद साधला, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. इंदापूर तालुका व परिसरात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह गुरुवार दि. १९ मार्च रोजी सायंकाळी सुमारे अर्धा तास अवकाळी पावसासह बावडा परिसरात जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतातील काढणी चालू असलेला गहू, हरभरा आदी रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले, डाळिंब, द्राक्ष, पेरू, केळी आदी फळबागांनाही या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
डाळिंब, पेरू फळबागा सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत असून, गारपिटीमुळे फळबागांमध्ये फुलगळ मोठ्या प्रमाणावरती होवून हानी झाली आहे. त्याचबरोबर काढणीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांमध्ये द्राक्षांना तडे जाऊन मोठ्या प्रमाणावरती मणी गळून पडले आहेत. शिवाय कडवळ, मकवान आदी चारा पिकांचेही वादळी वाऱ्याने जमिनीवर लोळल्याने नुकसान झाले असल्याचे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले. बावडा परिसरामध्ये ठिकठिकाणी या नुकसानग्रस्त फळबागा, शेती पिकांना अंकिता पाटील ठाकरे यांनी भेट दिली. या पाहणीनंतर गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले. इंदापूर तालुका व परिसरातील नुकसानग्रस्त फळबागा व शेती पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याचे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले. यावेळी इंदापूर पंचायत समिती सदस्या धनश्री पाटील, सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजीत घोगरे, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे, पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो :-बावडा परिसरामध्ये गारपिट ग्रस्त फळबागा, शेती पिकांची ठिकठिकाणी पाहणी करताना अंकिता पाटील ठाकरे व इतर.

