इंदापूर, डॉ. संदेश शहा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गलांडवाडी नं. १ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदा दिपक जाधव ( पळसदेव-बिजवडी गट ) उपस्थित होत्या. यावेळी इयत्ता पहिली मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे फुलांनी व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच गोड खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना सौ. हर्षदा जाधव म्हणाल्या, "गलांडवाडी नं. १ ही शाळा जिल्ह्यात मॉडेल स्कूल म्हणून निश्चितच आपला नावलौकिक निर्माण करेल. शाळेतील शिक्षकवृंद अत्यंत कर्तव्यदक्ष असून गावकऱ्यांचेही शाळेला मोलाचे सहकार्य लाभत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे आणि शाळेचा पट वाढविण्यासाठी पालकांनी देखील पुढाकार घ्यावा."
कार्यक्रमास केंद्रप्रमुख बाळासाहेब डांगे, मुख्याध्यापक रविंद्र सातव, शिक्षक सुहास मोरे, पौर्णिमा रणपिसे, मनीषा मोरे व अश्विनी फलफले उपस्थित होते. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र सपकळ, सदस्य मनोहर बोडके, संगीता गाडेकर यांच्यासह अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच भगवान मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सामोसे वाटप केले तर माजी सरपंच संतोष गलांडे यांनी विद्यार्थ्यांना बिस्किटे भेट दिली. शिक्षकवृंदाच्या वतीने जिलबीचे वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आनंददायी व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

