पुणे, डॉ. संदेश शहा. दिनांक १८ जून २६
बंगळुरू ( कर्नाटक ) येथील ऐतिहासिक चातुर्मास २०२५ यशस्वी पूर्ण केल्यानंतर यंदाचा चातुर्मास २०२६ पुणे पुष्कर धाम येथे करण्यासाठी पुण्यनगरी मध्ये राष्ट्रसंत उपप्रवर्तक प. पू. श्री नरेशमुनीजी म. सा. व संघाचा प्रथम प्रवेश दत्तनगर येथील आनंद दरबार येथे झाला. यावेळी राष्ट्रसंत उपप्रवर्तक प. पू. श्री नरेशमुनीजी म. सा. यांचे आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका व सहकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. यानिमित्त विश्वशांती साठी सामूहिक नवकार मंत्राचे पठण करण्यात आले.
आनंद दरबार मधील स्व. पुष्पादेवी माणिकचंदजी दुगड सभागृहात हा स्वागत समारंभ संपन्न झाला. यावेळी आध्यात्मिक मार्गदर्शन करताना राष्ट्रसंत उपप्रवर्तक प. पू. श्री नरेशमुनीजी म. सा. म्हणाले, दिनांक २६ जुलै रोजी सुरू होणाऱ्या चातुर्मासा साठी विद्यानगरी पुणे येथे संघाचे आगमन झाले असून जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा अहिंसा परमो धर्म तसेच जगा व जगू द्या याचा आध्यात्मिक संदेश याची पर्वणी सकल पुणेकर यांना मिळणार आहे. जीवनात आई, वडील, पृथ्वीमाता तसेच गुरुजनांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामुळे सर्व गुरु यांच्या प्रती संपूर्ण समर्पण असल्यास जीवन यशस्वी होते. राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री आनंदऋषीजी म. सा. यांची देशात प्रथमच चरण पादुका यांच्यासह सिद्ध प्रतिमा उभा करण्याचा स्तुत्य उपक्रम बाळासाहेब धोका यांनी केला असल्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्याला त्यांनी यावेळी आशीर्वाद दिला.
यावेळी प. पू. श्री शालिभद्रमुनीजी म. सा., म्हणाले, चातुर्मास पर्व हे जागरण पर्व असून आपले स्वत्व ओळखण्याचे व अनुभवण्याचे पर्व आहे. हे पर्व म्हणजे अहंकार, खोटी प्रतिष्ठा, आयुष्यात केलेल्या चुका दुरुस्त करून मोक्षमार्गाकडे वाटचाल करण्याचा राजमार्ग आहे. त्यासाठी प्रत्येकाने धार्मिक आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. यावेळी प. पू. श्री हार्दिकमुनीजी म. सा., प्रखर वक्ते प. पू. डॉ. मेघाश्रीजी म. सा., प्रवचनप्रभाकर प. पू. आभाश्रीजी म. सा., आदी संत महात्म्यांचे विचार तसेच दर्शनाचा लाभ उपस्थितांनी घेतला.
यावेळी अनिलजी नहार, पुष्कर धाम चे अशोक सालेचा, पुणे जिल्हाध्यक्ष विलास राठोड, सुनील चोरडिया आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भाषणात आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका म्हणाले, संत महात्म्यांचे आशीर्वाद ही आपणा सर्वांसाठी अध्यात्मिक पर्वणी असून सर्वांनी चातुर्मास काळात आध्यात्मिक आनंद लुटावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी प्रमोद राका, सुभाष लुणावत, दिलीप संचेती, सुभाष पिरगल, प्रकाश भटेवरा, दिपाली चुत्तर, अर्चना गादिया, सुजाता सुराणा, सुयोग भण्डारी आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सौरभ धोका यानी केले.
