इंदापूर: संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ.गिरीष देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर व विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात संस्थेच्या विविध विभागांतील सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांचे हक्क, सशक्तीकरण आणि आरोग्य या विषयांवर विचारमंथन करण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने व दीपप्रज्जवलनाने करण्यात आली, ज्याने संपूर्ण वातावरण आनंदमय आणि प्रेरणादायी केले. याप्रसंगी कर्मयोगी शंकररावजी पाटील आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रद्धा काळे, सौ. अश्विनी गारटकरआणि सौ. मंदाकिनी डोंबाळे उपस्थित होते. डॉ.काळे यांनी महिलांच्या आरोग्यावर सखोल चर्चा केली. त्यांनी विद्यार्थिनींना शारीरिक व मानसिक आरोग्याच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन केले. संतुलित आहार, योग व व्यायामाचे फायदे तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच सौ.अश्विनी गारटकर व सौ.मंदाकिनी डोंबाळे यांनी विद्यार्थीनीना कौशल्य विकासावर भर देण्यासाठी प्रेरित केले. विद्यार्थिनींनी कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त केले आणि महिलांच्या सशक्तीकरणावर आपले विचार मांडले. समाजातील महिलांनी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्यावर मात करण्यासाठी काय करायला हवे, यावर विद्यार्थिनींनी संवाद साधला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका काळे आणि वैष्णवी गुजर यांनी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संस्थेच्या फॅशन डिझायनिंग इंस्टीट्युट च्या प्रमुख सौ.त्रिशला पाटील यांनी केले. हा विशेष उपक्रम विद्यार्थिनींमध्ये महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भविष्यातही महिलांच्या सशक्तीकरणासाठी असे उपक्रम राबविले जातील, असे आयोजकांनी सांगितले.



